राखीव गटातून उचल झालेली वाळू गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 01:03 AM2019-07-07T01:03:23+5:302019-07-07T01:03:56+5:30
तीन हजार ब्रास वाळू
जळगाव : जिल्ह्यात वाळू चोरीचे प्रकार सर्रासपणे सुरू असताना आता तर जिल्ह्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बोदवड उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी राखीव असलेल्या आव्हाणी येथील गटातून उचल झालेली तीन हजार ब्रास वाळूच गायब झाल्याची माहिती मिळाली आहे. या गटातून उर्वरित वाळूची तत्काळ उचल करावी असे पत्र जिल्हा प्रशासनाकडून तापी महामंडळाला देण्यात आले आहे.
जिल्ह्यातील शासकीय योजनांच्या कामासाठी प्रशासनातर्फे काही वाळू गट राखीव ठेवण्यात आले होते. बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेच्या टप्पा १ मधील जुनोने धरणाच्या कामासाठी जळगाव तालुक्यातील सावखेडा, धरणगाव तालुक्यातील आव्हानी भुसावळ तालुक्यातील भानखेडे, जोगलखेडे, मुक्ताईनगर तालुक्यातील भोकरी, पातोंडी येथील गट राखीव म्हणून मंजूर करण्यात आले होते.
यातील आव्हाणी वाळू गटाची किंमत ३ कोटी ५० लाख ९२ हजार ५८ रूपयांचा तापी खोरे सर्वेक्षण विभागातर्फे प्रशासनाच्या गौणखनिज विभागाकडे भरणा करण्यात आला होता. या गटात ७ हजार ९८६ ब्रास वाळूसाठा मंजूर करण्यात आला होता. चक्रधर कन्स्ट्रक्शनला या गटातून वाळू वाहतुकीचे काम देण्यात आले. आत्तापर्यंत तीन हजार ब्रास वाळूची उचल या गटातून झाली आहे. मात्र प्रत्यक्षात ही वाळू गायब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. उचल झालेली वाळू नेमकी गेली कुठे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
दरम्यान या वाळू गटाचा ठेका रद्द करावा, असे पत्र तापी पाटबंधारे विभागाने जिल्हा प्रशासनास दिले होते. मात्र ठेका रद्द करता येत नाही असे सांगत उर्वरित वाळू साठा तात्काळ उचल न केल्यास भरलेली रक्कम जमा केली जाईल असे पत्र आता तापी पाटबंधारे विभागाला देण्यात आले आहे. उर्वरीत वाळूदेखील गायब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अवैध वाळू वाहतूक करणारे तीन डंपर जप्त
अवैध वाळू वाहतूक सुरूच असून शनिवारीदेखील अवैध वाळू वाहतूक करणारे तीन डंपर जप्त करण्यात आले. जिल्ह्यात वाळूची अवैध वाहतूक सर्रासपणे सुरू असल्याचा घटना दररोज समोर येत आहे. गेल्या आठवड्यात विदगाव येथे तापी नदी पात्रात व दापोरा येथे गिरणा नदी पात्रात वाळू वाहतूक रोखण्यावरून झालेले वादाच्या घटना ताज्याच असताना आता शनिवार, ६ रोजी पुन्हा तीन वाळू डंपर वाळू वाहतूक करताना आढळून आले.
शनिवारी सकाळी बांभोरी, खेडी व आव्हाणे शिवारात वाळू वाहतूक करताना तीन डंपर आढळून आल्याने महसूलच्या पथकाने ते पकडून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केले. सदरील डंपरवरवर दंडात्मक कारवाई केली जाणार असून त्यांचा पंचनामा करून तो तहसीलदार वैशाली हिंगे यांच्याकडे देण्यात आला. अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण यांच्यासह तलाठी व तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.