नशिराबादला श्रींना चंदनाचे लेपन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:13 AM2021-05-31T04:13:01+5:302021-05-31T04:13:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नशिराबाद: येथे झिपरू अण्णा महाराज यांच्या ७२ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त रणरणत्या उष्णतेचा श्रींना त्रास होऊ नये ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नशिराबाद: येथे झिपरू अण्णा महाराज यांच्या ७२ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त रणरणत्या उष्णतेचा श्रींना त्रास होऊ नये यासाठी श्रींच्या मूर्तीस शीतलमय चंदनाची उटी लेपन करण्यात आली. यावेळी सनईच्या मंगलमय सुरात श्रींचा नामघोष करीत वेद मंत्रोच्चारात, हरहर गंगेच्या गजरात विहिरींसह तीर्थोदकाने महाअभिषेक पूजन करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढली आहे. स्मारक समितीचे सचिव विनायक वाणी, संजय कुलकर्णी, चेतन खारे, पुजारी जयंत गुरव यांनी श्रींना चंदन लेपन केले व श्रींचा शृंगार केला. या वेळी हर हर गंगे, नमामि गंगे, सद्गुरू झिपरू अण्णा महाराज की जय असा गजर करण्यात आला.
असा होतो श्रींचा शृंगार...
श्रींच्या महाअभिषेकासाठी दूध, दही, तूप, मध, साखर या पदार्थांचे मिश्रण करून मूर्तीस व समाधीला दररोज स्नान घालण्यात येते. सुगंधी उटणे, गुलाब पाणी, विविध तीर्थांच्या पाण्याचा वापर करण्यात येतो. त्यानंतर मूर्तीस वस्त्र परिधान करून चंदनाचा टिळा (गंध) लावला जातो. रुद्राक्ष, स्फटिक, तुळशीमाळा घालण्यात येते. त्यानंतर फुलांनी आकर्षक सजावट करून मुकुट घातला जातो .महाआरती होते. सुगंध धुपांनी परिसर दरवळत असतो. विशेष म्हणजे दररोज वेगवेगळे मुकुट, फेटा, टोपी परिधान केली जाते. साईबाबा, गजानन महाराज, स्वामी समर्थांच्या स्वरूपात श्रींना शृंगार पोशाख परिधान केला जातो.