जळगावात वाळू ठेकेदार व चोरट्यांमध्ये धुमश्चक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:13 PM2018-08-10T12:13:00+5:302018-08-10T12:13:43+5:30
वाळू उपशावरून वाद
जळगाव : वाळूचा उपसा करण्यावरून कानळदा-दोनगाव दरम्यान असलेल्या नदीपात्रात वाळू ठेकेदार व चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये जोरदार वाद होऊन ठेकेदाराच्या जेसीबीच्या काचा फोडण्यात आल्या. हा प्रकार गुरुवारी दुपारी घडला. या ठिकाणी महसूल विभागाचे पथक तेथे पोहचले त्या वेळी तेथे काहीच आढळले नाही.
अवैध वाळू उपशास आळा बसविण्यासाठी शहर व परिसरात प्रयत्न केले जात आहे. यामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाईदेखील केली जात आहे. असे असले तरी वाळू वाहतूकदारांकडून वाळूची चोरी सुरूच असल्याचे प्रकार समोर येत आहे.
अशाच प्रकारे गुरुवारी दुपारी वाळू उपशावरून वाळू ठेकेदार व वाळूची चोरी करणाºयांमध्ये कानळदा शिवारात वाद झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दोनगाव वाळू गटाचा लिलाव झाला असून विलास यशवंते यांनी हा ठेका घेतलेला असल्याचे सांगण्यात आले.
गुरुवारी दुपारी या ठिकाणी वाळूचा उपसा सुरू असताना तेथे गावातील १० ते १५ तरुण पोहचले. त्यांनी वाळू उपशास मज्जाव केला व हा प्रकार महसूल विभागाला कळविला. मात्र वाळू ठेकेदार व अवैध वाळू उपसा करणाºयांमध्ये हा वाद झाल्याचे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले. वाळू ठेकेदाराच्या जेसीबीच्या काचा या वेळी फोडण्यात आल्या. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर महसूलचे पथक तेथे पोहचले असता तेथे काहीही आढळून आले नाही. मात्र त्या ठिकाणी काचेचे अवशेष आढळून आल्याची माहिती महसूल सूत्रांकडून मिळाली.
वाळू ‘तापतेय’
कानळदा शिवार व परिसरातील वाळू गटातून ठेकेदारामार्फत वाळूचा उपसा होत असला तरी चोरीच्या वाळूचीही मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. त्यामुळे कानळदा शिवारातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. त्याविरोधात नागरिक संतप्त असून गुरुवारी गावातील काही तरूण नदीपात्रात वाळूची वाहतूक रोखण्यासाठी पोहचले.