बोदवड उपसा सिंचनच्या नावावर इतर शहरांसाठी वाळू उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 02:18 PM2019-03-22T14:18:18+5:302019-03-22T14:19:03+5:30
अनेक गटांवरून अवैध उचल
जळगाव : धरणगाव तालुक्यातील आव्हाणीचा गिरणा नदीचा ठेका बोदवड उपसा सिंचनच्या कामासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र, या ठेक्यावरुन अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे आढळून येत आहे. दररोज शेकडो डंपर व ट्रॅक्टरव्दारे उपसा होत असल्याने आव्हाणी व आव्हाणे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
बोदवड उपसासिंचनच्या कामासाठी शासकीय ठेका असल्याने त्या ठिकाणाहून सिंचनाच्या ठिकाणावरच वाळू पोहचविणे आवश्यक आहे. मात्र, ठेक्यावरील काही ठेके दारांकडून शासकीय ठेक्याचा नावावर वैयक्तिक वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने नदीपात्राची भिषण अवस्था झाली असून, नदीपात्रात अनेक ठिकाणी खडक लागला असल्याने भूजल पातळीत देखील मोठ्या प्रमाणात घट होत आहे.
आव्हाणेच्या पात्रातून उपसा
बोदवड उपसा सिंचनसाठी केवळ आव्हाणीचा ठेका निश्चित करण्यात आला आहे. मात्र, आव्हाणे, खेडी या गावांमधील गिरणा नदीपात्रातूनही वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मात्र, महसूल प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. खेडी येथील बाळू चौधरी यांनी तीन दिवसांपुर्वी वाळू व्यावसायिकांना विरोध केल्यानंतर चौधरी यांना घरात जावून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी त्यांनी तालुका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या घटनेनंतर आव्हाणी येथील एका ग्रामस्थालाही वाळू व्यावसायिकांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली. ग्रामस्थांना वाळू व्यावसायिकांच्या मुजोरीचाही सामना करावा लागत आहे.
वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर व डंपर चालक हे भरधाव वेगाने वाहतूक करत असून यामुळे वाहनधारकांचाही जीव धोक्यात येत आहे. बुधवारी सकाळी १० वाजता भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने आव्हाणे येथील प्रशांत चौधरी या युवकाच्या मोटारसायकलला धडक दिली. ऐनवेळी प्रशांत चौधरीने मोटारसायकलवरून उडी घेतल्याने त्याचा जीव वाचला. मात्र, त्याच्या मोटालसायकलचे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर वाळू व्यावसायिक व ग्रामस्थांमध्ये चांगलीच हाणामारी देखील झाली. मात्र, या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही.
वाळू व्यावसायिकांसोबत साटेलोटे
शासकीय ठेक्याचा नावावर सुरु असलेला या गोरखधंद्यात वाळू व्यावसायिंक व ठेकेदारांनी आपआपसात मिलीभगत करून घेतली आहे. पहाटे ३ वाजेपासून गिरणा नदीपात्रात वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची अक्षरश जत्रा भरलेली दिसून येत आहे. एकाच वेळी नदीपात्रात १०० हून अधिक वाहनांव्दारे वाळू उपसा होत आहे. ३ हजार ब्रास वाळू या ठिकाणाहून उचलण्याची परवानगी असताना त्याहून अधिक वाळू उपसा झाल्याचे काही वाळू व्यावसायिकांनी खासगीत माहिती दिली आहे.