साने गुरुजी,बहिणाबाई यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’साठी संमेलनात ठराव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 11:09 AM2024-02-05T11:09:40+5:302024-02-05T11:10:20+5:30

मराठी भाषेला अभिजात दर्जासाठी ठराव करणार : विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Sane Guruji, Bahinabai to be posthumously awarded 'Bharat Ratna' in the meeting | साने गुरुजी,बहिणाबाई यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’साठी संमेलनात ठराव

साने गुरुजी,बहिणाबाई यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’साठी संमेलनात ठराव

चुडामण बोरसे

पूज्य साने गुरुजी साहित्यनगरी, अमळनेर : खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चाैधरी व साने गुरुजी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे यासह विविध ठराव पारित करीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा रविवारी संध्याकाळी समारोप झाला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी विधानसभेसह विधान परिषदेत ठराव करावा. या ठरावानुसार केंद्राकडे पाठपुरावा करून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी कटिबध्द असल्याचे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथून दृक-श्राव्य ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून संमेलनात थेट सहभागी झाले.

समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ. रवींद्र शोभणे  होते. प्रमुख पाहुणे म्हणून मराठी भाषा विकासमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री गुलाबराव पाटील,  मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अ.भा. साहित्य महामंडळाच्या कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, संमेलनाचे कार्याध्यक्ष डाॅ.अविनाश जोशी उपस्थित होते. 

अमळनेरला पुस्तकांचे गाव           म्हणून दर्जा देणार….
दीपक केसरकर यांनी अमळनेरला पुस्तकांचे गाव म्हणून दर्जा देणार असल्याची घोषणा केली. यासंदर्भात मंत्री अनिल पाटील यांनी मागणी केली होती. साने गुरुजींना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा म्हणून राज्य शासनाकडून केंद्राकडे मागणी करू, यावर्षी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणार, असेही केसरकर यांनी म्हणाले. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मराठी भाषा संवर्धनासाठी विधिमंडळात होत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. 

राजकीय कादंबऱ्यांसाठी
साजेसा काळ….
महाराष्ट्राच्या विकासावर लक्ष ठेवता-ठेवता डोळ्यांवर ताण पडल्याने डोळ्यांची शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे संमेलनास येता आले नाही. लेखकांना दर्जेदार राजकीय कादंबऱ्या लिहिण्यासाठी आजच्याएवढा साजेशा काळ कधीही नसेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.  

परंपरेचा धागा अमळनेरला जोडला….
संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र शोभणे म्हणाले की, साहित्य संमेलन माझ्यासाठी व्यक्ती म्हणून महत्त्वाचे आहे. स्थानिक आयोजक गेली चार ते पाच वर्षे वेगवेगळ्या संमेलनात हजेरी लावून व्यवस्थांचे निरीक्षण करायचे. अमळनेरला संमेलन झालेच पाहिजे हा त्यांचा निर्धार होता. गेल्यावर्षीचे संमेलन महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या विचारांच्या भूमीत झाले. याच विचारांच्या परंपरेचा धागा अमळनेरला जोडला गेला. साने गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वात महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या आदर्शांचे मिश्रण होते.

संमेलनात पारित झालेले ठराव

१) ग्रामीण भागात अनेक मराठी शाळा बंद पडून दुसऱ्या शाळांबरोबर जोडल्या जात आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांच्या अडचणी वाढत आहेत. यावर सरकारने परिणामकारक योजना कराव्यात. 
२) मराठीसह सर्व भारतीय भाषांची आकाशवाणी दिल्ली येथून प्रसारित होणारी राष्ट्रीय वार्तापत्रे त्या-त्या राज्यांच्या राजधानीत पाठविण्यात आली. त्यामुळे त्या भाषांचे दिल्लीतील राष्ट्रीय स्थान संपुष्टात आले आहे. ही वार्तापत्रे पुन्हा दिल्लीहून प्रसारीत करण्यात यावीत.
३) गुजराथी, मराठी शब्दकोशाची आवृत्ती सुधारून तयार करण्यासाठी  शासनाने अनुदान द्यावे.
४) बृह्नमहाराष्ट्रातील मराठी शिक्षण संस्थांना आधुनिकीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने एकरकमी अनुदान द्यावे.
५) काळाच्या ओघात कान्हादेशाचे अपभ्रंश होऊन खान्देश असे नामकरण झाले,  ते पूर्ववत कान्हादेश असे करण्यात यावे.
६) पूज्य साने गुरूजी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याची विनंती राज्य सरकारने केंद्र सरकारकडे करावी. 
७) कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याची विनंती राज्य सरकारने केंद्र सरकारकडे करावी. 
८) मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाच पाहिजे.
९) जळगाव व धुळे जिल्ह्यासाठी महत्वाच्या पाडळसे धरणाचा केंद्र सरकारच्या योजनेत समाविष्ट करावा. तसा प्रस्ताव केंद्राकडे महाराष्ट्र शासनाने त्वरित  पाठवावा.

पुढच्या संमेलनाचे प्रस्ताव मागवले…

उषा तांबे यांनी पुढील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ३१ मार्च २०२४ पर्यंत प्रस्ताव स्वीकारले जाणार आहेत, असे सांगितले.

Web Title: Sane Guruji, Bahinabai to be posthumously awarded 'Bharat Ratna' in the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.