जळगावमधील संजय पवार, नरेंद्र पाटील यांच्याविरुध्द मानहानीचा दावा दाखल करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 11:33 AM2018-04-15T11:33:33+5:302018-04-15T11:33:33+5:30
‘मविप्र’ प्रकरणात पत्रकार परिषदा घेऊन खोटे व बदनामीकाराक आरोप केल्याप्रकरणी संजय पवार, विजय पाटील, नरेंद्र पाटील व इतरांविरुध्द न्यायालयात बदनामीचा दावा दाखल करणार असल्याचे भोईटे गटाचे मानद सचिव निलेश भोईटे यांनी म्हटले आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१५ : ‘मविप्र’ प्रकरणात पत्रकार परिषदा घेऊन खोटे व बदनामीकाराक आरोप केल्याप्रकरणी संजय पवार, विजय पाटील, नरेंद्र पाटील व इतरांविरुध्द न्यायालयात बदनामीचा दावा दाखल करणार असल्याचे भोईटे गटाचे मानद सचिव निलेश भोईटे यांनी म्हटले आहे. भोईटे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शासनाच्या शिक्षण विभागाने भोईटे गटाच्या संचालक मंडळाच्या बाजूने आदेश दिले आहेत. दोन महिने उलटून अनेक प्रयत्न केल्यानंतर उच्च न्यायालयात स्थगिती मिळविण्यात अपयश आल्याने विजय पाटील व त्यांचे साथीदार अपयश झाकण्यासाठी वांरवार पत्रकार परिषदा घेऊन खोटे व बदनामीकारक आरोप करीत आहेत. संस्थेच्या इमारत ताब्याबाबत औरंगाबाद खंडपीठ व तहसीलदारांकडे प्रकरणे दाखल असून ते न्यायप्रविष्ट आहेत.तसेच शिक्षण विभागाचे आदेशसुध्दा खंडपीठाने कायम ठेवले आहे, त्यामुळे अस्तित्व संपुष्टात येत असल्याची भीती पाटील गटाला वाटत आहे. न्यायालयात देखील आपण टिकू शकणार नाही, हे मागील दोन महिन्याच्या प्रयत्नावरुन दिसून येत आहे. न्यायालयात थारा मिळत नसल्याने हा गट हतबल झालेला आहे. दरम्यान, कायदा हातात घेणाºयांविरुध्द जिल्हाधिकाºयांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी निलेश भोईटे यांनी केली आहे.
हस्तांतर सुनावणी पुढे ढकलली
महाविद्यालय पदभार हस्तांतर प्रकरणी नरेंद्र पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीचे कामकाज १३ एप्रिल रोजी न्यायालयाने एक महिन्यासाठी पुढे ढकलले आहे. या याचिकेतील ‘जैसे थे’चे आदेश कायम आहेत.