मविआत फूट पडली, अजित पवार समर्थकाचा विजय; काँग्रेसनं दिली शिवसेना-भाजपाला साथ
By सुनील पाटील | Published: March 11, 2023 01:32 PM2023-03-11T13:32:08+5:302023-03-11T13:34:23+5:30
भाजप, शिवसेना, काँग्रेसच्या मदतीने अध्यक्षपदी संजय पवार विजयी, जळगाव जिल्हा बँक राष्ट्रवादीकडून शिवसेनेकडे.
जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेली जळगाव जिल्हा बँक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या ताब्यात गेली आहे. शिवसेना, भाजपा व काँग्रेसच्या मदतीने संजय पवार अध्यक्षपदी विजयी झाले आहेत. तर शिवसेनेचे अमोल चिमणराव पाटील हे उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले आहेत. संजय पवार राष्ट्रवादीतून फुटून शिवसेनेत गटात सामील झाल्याने जिल्हा बँक राष्ट्रवादीच्या हातातून निसटली.
अध्यक्षपदासाठी रवींद्र पाटील व संजय पवार यांनी अर्ज दाखल केला होता. पाटील यांना दहा तर संजय पवार यांना अकरा मते मिळाली. राष्ट्रवादीकडून रवींद्र पाटील यांचे नाव निश्चित केले होते. आपल्याला डावलले जात असल्याने पवार यांनी बंडखोरी केली. विशेष म्हणजे संजय पवार हे अजित पवारांचे समर्थक मानले जायचे. त्यात या निकालाने राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीतीच बंडखोरीमुळे पक्षाचे उमेदवार ॲड रवींद्र पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला. तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे उमेदवार अमोल पाटील बिनविरोध झाली. महाविकास आघाडीत गद्दारी झाल्याची खंत एकनाथ खडसेंनी व्यक्त केली.