संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर झाल्याने जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:15 AM2021-03-06T04:15:45+5:302021-03-06T04:15:45+5:30
जळगाव : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप असलेले संजय राठोड यांचा वनमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ...
जळगाव : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप असलेले संजय राठोड यांचा वनमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकताच मंजूर केला. त्यामुळे शुक्रवारी दुपारी जिल्हा भाजपच्यावतीने फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासन तसेच संजय राठोड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जो पर्यंत पूजा चव्हाणला न्याय मिळत नाही, तोपर्यंत भाजपकडून या प्रकरणात पाठपुरावा सुरूच राहील, असेही या वेळी सांगण्यात आले.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर भाजपच्यावतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले होते. जळगावातही आंदोलनाचा प्रयत्न झाला, मात्र पोलिसांनी तो उधळून लावला होता. अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला होता. राज्यपालांनी हा राजीनामा नुकताच मंजूर केला आहे. त्यामुळे जळगावात भाजपच्यावतीने फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
भाजपच्या पाठपुराव्याने राजीनामा
महापौर भारती सोनवणे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेवक कैलास सोनवणे, प्रदीप रोटे, महेश जोशी, माजी नगरसेवक राजेंद्र मराठे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. महापौर सोनवणे यांनी सांगितले की, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने पाठपुरावा करीत तिला न्याय मिळावा, ही भूमिका घेतली. म्हणूनच संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला आहे. पूजा चव्हाणला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत भाजपकडून या प्रकरणात पाठपुरावा सुरूच राहील, असेही महापौर सोनवणे यांनी सांगितले.