भुसावळ शेतकी संघाच्या निवडणुकीत आमदार संजय सावकारे यांना धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 03:56 PM2017-12-12T15:56:05+5:302017-12-12T15:59:00+5:30
एक मत फुटल्याने माजी आमदार संतोष चौधरी गटाचे पंढरीनाथ पाटील चेअरमनपदी
आॅनलाईन लोकमत
भुसावळ,दि.१२ : तालुका शेतकी संघाच्या चेअरमनपदाच्या निवडणुकीत भाजपचे आमदार संजय सावकारे यांच्या सहकार पॅनलकडे बहुमत असतानाही एक मत फुटले. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार संतोष चौधरी गटाचे पंढरीनाथ तुकाराम पाटील (कन्हाळा, ता.भुसावळ) हे चेअरमन तर गोविंदा तुकाराम ढोले (मनूर, ता.बोदवड) हे व्हा.चेअरमनपदी निवडून आले.
तालुका शेतकी संघाच्या चुरशीच्या निवडणुकीत आमदार संजय सावकारे यांच्या सहकार गटाला आठ तर माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पॅनलला सात जागा मिळाल्या होत्या.
सोमवारी दुपारी चेअरमन व व्हा.चेअरमन निवडीसाठी संचालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात चौधरी गटाचे पंढरीनाथ तुकाराम पाटील व व्हा.चेअरमन पदाचे उमेदवार गोविंदा तुकाराम ढोले यांना प्रत्येकी ८ मते मिळाली आहे तर आमदार सावकारे गटाचे चेअरमनपदाचे उमेदवार अनिल पंडित पाटील व व्हा. चेअरमनपदाचे उमेदवार प्रशांत निकम यांना प्रत्येकी ७ मते मिळाली आहे. अवघ्या एका मताने आमदार सावकारे गटाच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. भाजपला हा धक्का मानला जात आहे. चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने झाली.
यात सावकारे यांच्या गटाचा एक संचालक चौधरी यांच्या गटाला जाऊन मिळाल्याने त्यांना सहज विजय मिळविता आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक आर.आर. पाटील व साहाय्यक म्हणून आऱ पी़ निकाळे यांनी काम पाहिले.
नवनिर्वाचितांचा सत्कार
निवड जाहीर होताच माजी आमदार संतोष चौधरी, जिल्हा बँकेचे संचालक अॅड. रवींद्र पाटील, कृउबाचे सभापती सोपान भारंबे, सचिन चौधरी, पं.स.चे माजी सभापती राजेंद्र चौधरी आदींनी शेतकी संघ कार्यालयात जाऊन नवनिर्वाचित चेअरमन व व्हा.चेअरमन यांचा सत्कार केला. या वेळी चौधरी यांनी शेतकी संघाची भरभराट होईल, असे आश्वासन दिले तर काही लोकांनी निवडणूक लादण्याचा आरोप त्यांनी केला.