आयुष्यमान भारत योजना नागरिकांकरिता ठरतेय संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 05:52 PM2019-06-26T17:52:48+5:302019-06-26T17:53:23+5:30
पारोळा : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत केंद्र शासनाने निश्चित केलेल्या पात्र लाभार्थ्यांना प्रतिवर्षी प्रतिकुटुंब आरोग्यासाठी पाच लाख ...
पारोळा : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत केंद्र शासनाने निश्चित केलेल्या पात्र लाभार्थ्यांना प्रतिवर्षी प्रतिकुटुंब आरोग्यासाठी पाच लाख रुपये विमा संरक्षण दिले जाणार आहे.
या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना ठरावीक आजारासाठी देशभरातील कोणत्याही मान्यताप्राप्त रुग्णालयात उपचार घेता येतील. या योजनेमध्ये सुमारे एक हजार १२२ आजारांचा समावेश आहे. यासाठी लाभार्थी कुटुंबांना ई-कार्ड देण्यात येणार आहेत.
पारोळा शहरातील ४ हजार १७८ व ग्रामीण भागातील १७ हजार ४१२ कुटुंबांना याचा लाभ होणार आह. यामध्ये लाभार्थ्यांना कुटुंब प्रमुखाच्या नावाने पंतप्रधानांचे साक्षांकित पत्र आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत यापूर्वीच वाटप करण्यात आले आहेत. ज्यांना हे पत्र मिळाले आहे अशा लाभार्थ्यांनी कॉमन सर्व्हिस सेंटर (सेतू सुविधा केंद्र) वर जाऊन हे कार्ड तयार करून घ्यावे. या पत्रासोबत रेशन कार्ड, आधार कार्ड अथवा ते नसल्यास मतदान कार्ड घेऊन नजीकच्या सेतू सुविधा केंद्रावर जाऊन हे कार्ड तयार करून घ्यावे. कार्ड काढण्याची शासकीय फी फक्त तीस रुपये आहे. कुणीही यापेक्षा जास्त शुल्क दऊ नये, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.तुषार मोरे यांच्यातर्फे करण्यात येत आहे.
योजना कोणासाठी...
ग्रामीण भागातील अनुसूचित जाती-जमातीे, दारिद्रयरेषेखालील कुटुंब, भूमिहीन, दिव्यांग, अतिकष्टाचे काम करणारे कुटुंब, एका खोलीत कच्च्या घरात राहणारे, महिला कुटुंबप्रमुख असलेले यांचा समावेश आहे.
शहरी भागातील कचरावेचक कुटुंब, भिक्षा मागणारे, रस्त्यावर विक्री करणारे, बांधकाम, रंगकाम कारागीर, प्लम्बर, गवंडी, वेल्डर, गटई कामगार, फेरीवाले, सफाई कामगार, हस्तकला कारागीर, शिंपी, वाहतूक कर्मचारी, चालक, वाहक व सायकलरिक्षा ओढणारे, दुकान कामगार, शिपाई, अटेंडंट, वेटर, मेकॅनिक, वीजतंत्री, धोबी, चौकीदार आदी कुटुंबांना पात्र ठरवण्यात आले आहे.