संत मुक्ताई संस्थानने पाठविल्या संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानकाकांना राख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:21 AM2021-08-22T04:21:28+5:302021-08-22T04:21:28+5:30
मुक्ताईनगर : बहीण-भावाच्या नात्याचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. या पवित्र धाग्याचे नाते जपत मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई संस्थांच्या वतीने ...
मुक्ताईनगर : बहीण-भावाच्या नात्याचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. या पवित्र धाग्याचे नाते जपत मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई संस्थांच्या वतीने दरवर्षी संतश्रेष्ठ ज्ञानोबाराय, तसेच संत निवृत्तीनाथ व सोपानकाका यांना दरवर्षी राखी पाठवण्याची परंपरा याही वर्षी संस्थांनी कायम ठेवले असून, राख्या पोहोचलेल्या आहेत, तर आपेगाव येथे चारही बहीण-भावंडांच्या मूळ जन्मगावीही राख्या पाठविण्यात आल्या. २२ रोजी रक्षाबंधननिमित्त आदिशक्ती मुक्ताबाई ही त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ संस्थानकडून आलेली साडी आणि चोळी परिधान करणार आहे.
दरवर्षी संत मुक्ताबाई संस्थानकडून आपल्या तीनही भावंडांना राखी पाठविली जाते. गेल्या काही वर्षांपासून ही परंपरा संस्थाने कायम ठेवली असून, मुक्ताई संस्थांकडून बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या राखीच्या धाग्याने ही संस्थाने केवळ जोडली गेलेली नसून, प्रेमाचा ओलावाही निर्माण झाल्याची माहिती संस्थांचे अध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील यांनी दिली.
पंढरपूर यात्रेच्या दरम्यान दरवर्षी तीनही भावंडांकडून आदिशक्ती संत मुक्ताबाईला साडीचोळी ही भेट स्वरूपात विधिवत पूजा करून दिली जाते. या वर्षी त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ संस्थानची आलेली साडी आणि चोळी ही रक्षाबंधनच्या दिवशी आदिशक्ती मुक्ताई परिधान करणार आहे. संत ज्ञानदेवांकडून आलेली साडी-चोळी ही भाऊबीजेच्या दिवशी परिधान केली जात असल्याची परंपरा असल्याची माहिती, मुक्ताई संस्थानचे व्यवस्थापक हरिभक्त परायण रवींद्र हरणे महाराज आणि हरिभक्त परायण उद्धव जुनारे महाराज यांनी दिली.