संत मुक्ताबाई अंतर्धान सोहळा साध्या पद्धतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:13 AM2021-06-05T04:13:11+5:302021-06-05T04:13:11+5:30
पहाटे अभिषेक व पूजा व्यवस्थापक विनायकराव हरणे व शीला हरणे या यांच्या हस्ते करण्यात आली. सकाळपासून मुक्ताई ...
पहाटे अभिषेक व पूजा व्यवस्थापक विनायकराव हरणे व शीला हरणे या यांच्या हस्ते करण्यात आली. सकाळपासून मुक्ताई गाथा पारायण करण्यात आले. अंतर्धान सोहळ्याची वेळ साधत हरिभक्तांचा मेळा रंगलेला होता. याचवेळी मंदिराचे व्यवस्थापक रवींद्र हरणे महाराज यांचे कीर्तन सुरू होते. आदिशक्ती मुक्ताबाई या ज्या वेळेला अंतर्धान पावल्या, त्याचवेळी महाआरती व अभिषेक करण्यात आला.
मुक्ताई अंतर्धान सोहळ्यानिमित्त हजारोंच्या संख्येने वारकरी येत असतात. यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे केवळ पंचवीस भाविकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. पंढरपूर येथील विठ्ठलाच्या पादुका तसेच पंढरपूर येथील संत नामदेव महाराज संस्थानच्या पादुका व त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पादुका या सोहळ्याला उपस्थिती देतात. मात्र यावर्षीही कोरोनामुळे या पादुका आपल्या लाडक्या मुक्ताईच्या भेटीला येऊ शकल्या नाही.
तीनही मंदिरात झाला सोहळा
कोथळीस्थित जुने मुक्ताई मंदिर, बोदवड रस्त्यावरील नवीन मुक्ताई मंदिर तसेच मेहुण येथील मुक्ताई मंदिर अशा तीनही ठिकाणी महापूजेचा सोहळा झाला.
स्वामी समर्थ केंद्रात मुक्ताईचंडी पूजा
स्वामी सेवा मार्ग दिंडोरी यांच्या वतीने ऑनलाइन मुक्ताईचंडी सेवेचे आयोजन करण्यात आले होते. या ऑनलाइन सेवेत सेवेकऱ्यांनी सहभागी होऊन कोरोना महामारीचे उच्चाटन व्हावे म्हणून आई मुक्ताई चरणी साकडे घातले.