जळगावातील संत मुक्ताबाई राम पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 01:12 PM2018-06-27T13:12:15+5:302018-06-27T13:16:36+5:30
भाविकांचा अपूर्व उत्साह
जळगाव : सावळ््या विठूरायाच्या भेटीची आस लागलेल्या जळगावातील ेसंत मुक्ताबाई राम पालखीसह शेकडो वारकरी, भाविक बुधवारी सकाळी आल्हाददायक वातावरणात पंढरपूरकडे विठू माऊलीच्या भेटीला मार्गस्थ झाले.
जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानतर्फे श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळा अर्थात जळगाव ते पंढरपूर वारीचे बुधवारी वटसावित्री पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर २७ रोजी सकाळी पंढरपूरकडे प्रस्थान होताना भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.
१४६ वर्षांची परंपरा लाभलेली ही वारी डोळ्यात आणि मनात साठवून घेण्यासाठी आणि तिला निरोप देण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत अप्पा महाराज समाधी मंदिराजवळ बुधवारी पहाटे प्रभू श्रीरामांच्या मूर्तीस पूजाभिषेक, श्री संत मुक्ताबाई यांच्या पादुकांना, श्री अप्पा महाराज, वासुदेव महाराज, केशव महाराज समाधी स्थान व बाळकृष्ण महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
त्यानंतर अप्पा महाराजांचे वंशज व विद्यमान गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज यांच्या उपस्थितीत अॅड. सुशील अत्रे, शिवाजीराव भोईटे आदींच्या यांच्याहस्ते पालखीचे पूजन होऊन ती मार्गस्थ झाली.