मनपाच्या ६५० कर्मचाऱ्यांना ८७ लाखांचे सानुग्रह अनुदान वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:14 AM2021-04-14T04:14:51+5:302021-04-14T04:14:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या वर्षभरापासून महापालिका प्रशासनातील कर्मचारी कोरोनावरील उपाययोजनांसाठी सातत्याने काम करत आहेत. तसेच अनेक कर्मचाऱ्यांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या वर्षभरापासून महापालिका प्रशासनातील कर्मचारी कोरोनावरील उपाययोजनांसाठी सातत्याने काम करत आहेत. तसेच अनेक कर्मचाऱ्यांना सुटीच्या दिवशीदेखील काम करावे लागत आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची असतानादेखील मनपा प्रशासनाने वर्षभर सातत्याने काम करत असलेल्या मागासवर्गीय ६५० कर्मचाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एक अनोखी भेट दिली असून, ८७ लाखांचे सानुग्रह अनुदान मनपा कर्मचाऱ्यांच्या खात्यावर सोमवारी वर्ग करण्यात आले आहे.
प्रत्येक सणासाठी महापालिकेचा कर्मचाऱ्यांसाठी विशेष अनुदान निश्चित केले जात असते. अनुदानाची रक्कम महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दर महिन्याला कपात केली जाते. मात्र अनेक वर्षांपासून महापालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कर्मचाऱ्यांचे हक्काचे सानुग्रह अनुदानदेखील कर्मचाऱ्यांना वेळेवर मिळत नव्हते. गेल्यावर्षी महापालिकेची मालमत्ता कराची वसुलीदेखील चांगली झाली नव्हती. यावर्षीदेखील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वसुलीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. त्यामुळे यंदा कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळेल की नाही याबाबत अनेकांच्या मनात शंका होती. अखिल भारतीय सफाई मजदूर संघाचे अध्यक्ष अजय घेंगट महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन महापालिका कर्मचाऱ्यांना यावर्षी तरी सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी केली होती. तसेच अनेक कर्मचाऱ्यांनीदेखील महापौर जयश्री महाजन यांच्याकडे ही मागणी केली होती. याबाबत महापौरांनी महापालिका आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर सोमवारी मनपाच्या ६५० कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १२ हजार रुपयांप्रमाणे ८७ लाखांचे सानुग्रह अनुदान प्राप्त झाले आहे. मनपाच्या या निर्णयाचे सर्व कर्मचारी वर्गाकडून स्वागत केले जात आहे.