सप्तक्षृंगी माता जळगावच्या एस.टी.बस आगाराला पावली, यात्रेदरम्यान ८० लाखांचे उत्पन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 02:39 PM2023-04-08T14:39:38+5:302023-04-08T14:47:51+5:30
भाविकांसाठी गडावर मारल्या ८९४ दुहेरी फेऱ्या
कुंदन पाटील
जळग़ाव : वणी (कळवण) गडावरची सप्तक्षृंगी माता जळगावच्या एस.टी.बस आगाराला पावली आहे. यंदाच्या यात्रोत्सवात जळगाव विभागाला तब्बल ८० लाखांचे उत्पन्न मिळाल्याने एस.टी.ला ऊर्जेचे इंधन मिळाले आहे.
६ एप्रिल रोजी सप्तक्षृंगी मातेची यात्रा भरते. आठ दिवस आधीच भाविकांची रेलचेल सुरु होत असल्याने सप्तक्षृंगी गडावर प्रचंड गर्दी असते. समस्त खान्देशकरांसाठी श्रद्धास्थान असणाऱ्या सप्तक्षृंगीच्या यात्रोत्सवासाठी जळगावच्या एस.टी.विभागाच्यावतीने विशेष बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे. ४४७ बस सेवेसाठी उपलब्ध करण्यात आल्या होत्या. दि.१ ते ७ एप्रिलदरम्यान ही सेवा पुरविण्यात आली. त्यातून जळगाव विभागाला तब्बल ८० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
प्रतिकिलोमीटर ४१ रुपये नफा
सप्तक्षृंगी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त ४४७ बस भाविकांसाठी पुरविण्यात आल्या होत्या. तसेच वणी गडावर जळगाव विभागातील ३५ जणांचे मनुष्यबळ भाविकांच्या सेवेसाठी रवाना झाले होते. वाहतूक नियंत्रक भगवान जगनोर यांच्या नेतृत्वाखाली विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांनी यात्रा प्रमुख म्हणून नेतृत्व केले. ४४७ बसगाड्यांनी गेल्या आठ दिवसात ८९४ दुहेरी फेऱ्या मारल्या. त्यातून प्रतिकिलोमीटर ४१ रुपयांचा नफा जळगाव विभागाला मिळाला. जळगाव विभागाचा यात्रोत्सवासाठी गेलेला कर्मचाऱ्यांचा ताफा शुक्रवारी सायंकाळी परतला.
सहकाऱ्यांनी केलेल्या पद्धतशीर नियोजनामुळे जळगाव विभागाला चांगले उत्पन्न मिळाले आहे. या सहकाऱ्यांनी गेल्या आठ दिवसात प्रचंड मेहनत घेतली. म्हणूनच ‘एसटी’ला आर्थिक बुस्टर मिळाले आहे.
भगवान जगनोर,
विभागीय वाहतूक नियंत्रक.