सारा हॉस्पिटलविषयी खोटी तक्रार केल्याचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:21 AM2021-04-30T04:21:27+5:302021-04-30T04:21:27+5:30
सारा हॉस्पिटलमध्ये नूर मोहम्मद पटेल यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना गुरूवार, २२ ...
सारा हॉस्पिटलमध्ये नूर मोहम्मद पटेल यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना गुरूवार, २२ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला. उपचार सुरू असतानाच नूर पटेल यांनी आपली योग्य ती काळजी घेतली जात नसल्याची चिठ्ठी बाहेर पाठविली होती. त्यात त्यांनी रुग्णालयात रात्री असलेला कर्मचारी वर्ग आपल्याकडे लक्ष देत नाही तसेच कृत्रिम ऑक्सिजनबाबतच्या समस्येवरदेखील त्यांनी लिहिले होते, अशी माहिती शोएब पटेल यांनी दिली होती.
याविषयी रुग्णालयाने आपले म्हणणे सादर करीत नूर मोहम्मद पटेल यांच्या मृत्यूसंदर्भात रुग्णालयाविरोधात खोटी तक्रार केली गेली असून मयताचे भाऊ अब्दुल रहेमान हमदू पटेल यांनी कोणतीही तक्रार नसल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून दिले असल्याचे म्हटले आहे. यासोबत अब्दुल रहेमान हमदू पटेल यांनी लिहून दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, रुग्णालयात माझ्या भावाची योग्य काळजी घेतली जात होती. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला व आम्हाला बिलाची अडवणूक न करता मृतदेह ताब्यातही दिला होता. यात तक्रार करणारा शोएब पटेल हा आमचा नातेवाईक आहे की नाही, हे मी सांगू शकत नाही मात्र तो दफनविधीलाही उपस्थित नव्हता, असे सांगत रुग्णालयाविषयी खोटी तक्रार केली असल्याचे म्हटले आहे.