कोळी समाजाच्या महिलांकडून साडी-चोळी, बांगड्यांचा शासनाला आहेर देण्याचा प्रयत्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2023 06:17 PM2023-10-25T18:17:02+5:302023-10-25T18:17:15+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या सोळा दिवसांपासून आदिवासी कोळी समाजातर्फे विविध मागण्यांच्या संदर्भात आमरण उपोषण सुरू आहे.
भूषण श्रीखंडे
जळगाव: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या सोळा दिवसांपासून आदिवासी कोळी समाजातर्फे विविध मागण्यांच्या संदर्भात आमरण उपोषण सुरू आहे. बुधवारी इंदुबाई बहुउद्देशीय महिला मंडळातर्फे शासनाला साडी, चोळी, बांगड्यांचा आहेर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत हे साहित्य जप्त केले. नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ निवेदन स्वीकारून ते शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.
आदिवासी कोळी समाज समन्वय समितीतर्फे १० ऑक्टोबरपासून आदिवासी कोळी समाजाला अनुसूचित जमातीचा दाखला, जातवैधता प्रमाणपत्र मिळावे, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू आहे. बुधवारी, दि. २५ रोजी, इंदुबाई बहुउद्देशीय मंडळातर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन व साडी-चोळी, बांगड्या देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी महिला आंदोलनकर्त्यांना साडी-चोळी व बांगड्यांचा आहेर देता येणार नाही, असे सांगितले. केवळ निवेदन द्यावे, अशी विनंती केली; तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महिलांना समजावत तुम्ही केवळ निवेदन द्यावे, आणलेल्या वस्तू गरीब महिलेला द्या, अशी विनंती केली. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व आमदार सुरेश भोळे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी जिल्हाधिकारी व आमदार यांनी तुमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. प्रा.भाऊसाहेब सोनवणे, मंगला सोनवणे, बबलू सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.