रोकड न मिळाल्याने चक्क चोरट्यांनी लांबविल्या शिक्षिकेच्या साड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:13 AM2021-06-04T04:13:18+5:302021-06-04T04:13:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : धुळे येथे माहेरी गेलेल्या वृंदा गणपत गरुड (वय ५६) या शिक्षिकेचे मोहाडी रस्त्यावरील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : धुळे येथे माहेरी गेलेल्या वृंदा गणपत गरुड (वय ५६) या शिक्षिकेचे मोहाडी रस्त्यावरील बंद घर फोडून चोरट्यांनी २५ हजार रुपये किंमतीच्या दहा साड्या चोरुन नेल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वृंदा गरुड या बांभोरी,ता.धरणगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. मोठी मुलगी स्वप्नाली निकम पुणे येथे असल्याने तिच्या लहान बाळाचा सांभाळ करण्यासाठी पती तेथे गेलेले आहेत. वृंदा गरुड या ४ मे रोजी सकाळी सात वाजता घराला कुलूप लावून धुळे येथे माहेरी गेल्या होत्या. तेव्हापासून घर बंद आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजता पुतण्या कुणाल गरुड याने घरात चोरी झाल्याची माहिती फोन करुन कळवली. ही माहिती ऐकून वृंदा गरुड या तातडीने जळगावात दाखल झाल्या. घराची पाहणी केली असता बेडरुममधील कपाट उघडे होते. साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाटातील २५,३०० रुपये किंमतीच्या दहा साड्या चोरट्यानी लांबविल्याचे उघड झाले. घरातील इतर वस्तू मात्र सुरक्षित आहेत. रोकड नसल्याने चोरट्यांची निराशा झाली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.