जळगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत एक सरंपच, 30 सदस्य बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:46 PM2017-12-15T12:46:04+5:302017-12-15T12:48:04+5:30
सरपंच पदाच्या 15 तर सदस्य पदाच्या 69 उमेदवारांनी घेतली माघार
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 15- तालुक्यातील 11 ग्रामपंचायतसाठी दाखल केलेल्या एकूण 278 उमेदवारांपैकी गुरुवारी माघारीच्या दिवशीच्या सरपंच पदाच्या 15 तर सदस्य पदाच्या 69 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 163 उमेदवार रिंगणात आहे. तालुक्यातील 11 ग्रामपंचायतपैकी सात ग्रामपंचायतचे एकूण 30 सदस्य बिनविरोध ठरले आहेत तर पळसोद ग्रामपंचायतच्या सरपंच यापूर्वीच बिनविरोध ठरल्या आहेत.
जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरु आह़े जळगाव तालुक्यात सरपंचपदासाठी 44 तर सदस्यपदासाठी 234 अर्ज प्राप्त झाले होते. या सर्व अर्जाची मंगळवारी छाननी होऊन यात एकही अर्ज अवैध ठरला नव्हता. त्यानंतर गुरुवारी माघारीच्या दिवशी सरपंचपदाच्या 15 तर सदस्यपदाच्या 69 उमेदवारांनी माघार घेतली.
सात ग्रामपंचायतचे 30 सदस्य बिनविरोध
पळसोद ग्रामपंचायतचे 7, निमगाव बु. - 7, खेडी खुर्द - 1, डोणगाव - 3, लोणवाडी बु. - 6, विटनेर - 2, जामोद- 4 एवढे सदस्य बिनविरोध ठरले आहे. पळसोद ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी राधाबाई पंकज पाटील यांचा एकमेव अर्ज अर्ज आलेला होता व तो अर्ज वैध ठरल्याने सरपंचपदी राधाबाई पाटील यांच्या बिनविरोध निवडवर शिक्कामोर्तब झालेला आहे.
आता सरपंचपदासाठी 28 तर सदस्यपदासाठी 135 असे एकूण 163 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.