गौणखनिज चोरी रोखण्यात कसूर केल्यास सरपंच अपात्र व पोलीस पाटील होणार निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 09:16 PM2020-01-18T21:16:16+5:302020-01-18T21:17:28+5:30
गौणखनिजाची चोरी रोखण्याची जबाबदारी केवळ महसूल विभागाची नाही. सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक या तिन्ही घटकांची राहणार आहे.
एरंडोल, जि.जळगाव : गौणखनिजाची चोरी रोखण्याची जबाबदारी केवळ महसूल विभागाची नाही. सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक या तिन्ही घटकांची राहणार आहे. या पार्श्वभूमीवर या सर्व घटकांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारून गौणखनिज चोरीला आळा घालावा. यात कसूर केल्यास सरपंचांना अपात्र करू आणि पोलीस पाटलांना निलंबित करू, असा इशारा प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी दिला आहे.
पंचायत समितीच्या सभागृहात शनिवारी पारोळा, धरणगाव व एरंडोल तालुक्यातील रेतीघाट असलेल्या गावांचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. त्यात ते बोलत होते.
३ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयाप्रमाणे ग्राम दक्षता समिती, ग्रामपंचायत व पोलीस पाटील यांनी अवैध गौणखनिज रोखण्यासाठी जबाबदारीने काम करावे, अशी सूचना त्यांनी केली. या कामी दुर्लक्ष किंवा टाळाटाळ केल्यास सरपंच अपात्र करणे व पोलीस पाटील निलंबित करणे अशी कारवाई करण्यात येणार आहे, असा सज्जड इशाराही या बैठकीत देण्यात आला. तसेच ग्रामसभेने ठराव न दिल्यास किंवा हेतूत: विरोध केल्यास सर्वस्वी गौणखनिजाची चोरीची जबाबदारी ग्रामपंचायतीची राहील, असे सांगण्यात आले.