‘सर्वोदय’च्या निवडणूक प्रचार तोफा शांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 02:45 PM2021-04-30T14:45:16+5:302021-04-30T14:46:35+5:30
उंबरखेडेस्थित सर्वोदय शिक्षण संस्थेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे २४ तास उरले आहेत.
चाळीसगाव : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधणा-या उंबरखेडेस्थित सर्वोदय शिक्षण संस्थेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे २४ तास उरले आहेत. जाहीर प्रचाराचा वणवा शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता शांत झाला आहे. रविवार, दि. २ मे रोजी मतदान होत असून, सोमवारी निकालाचे फटाके फुटणार आहे. कोरोनाची खबरदारी घेऊन मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असून तयारी पूर्ण झाली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून सर्वोदयचा धुराळा चर्चेत आहे. मार्चमध्ये उमेदवाराचे कोरोनाने निधन झाल्यानंतर ही निवडणूक महिनाभर लांबली. न्यायालयाच्या आदेशान्वये ही रणधुमाळी होत असल्याने सर्वांचे यालढाई लक्ष एकवटले आहे. १९ जागांसाठी ४५ उमेदवार नशिब आजमवित आहे. दोन पॕनलमध्ये समोरासमोर लढत असल्याने चुरस निर्माण झाली आहे.
कोरोनाची खबरदारी घेऊनच मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. १० मतदान केंद्रांवर सुरक्षित अंतर पाळून सभासदांना मतदान करता येणार आहे. मतदान केंद्राच्या प्रवेशव्दावरच मतदारांचे निर्जंतुकीरण करून तापमानही मोजले जाईल. त्रास असणा-यांना शेवटच्या अर्ध्या तासात मतदान करता येणार आहे.
एकूण १० मतदान केंद्रांवर पन्नासहून अधिक कर्मचारी मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे. ४६७० मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल.
उमदवारांसमोर मतदानाचे आवाहन
कोरोना महामारीतच इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेतल्या. मतदान मागितले. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचे मोठे आवाहन असणार आहे. जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी दोन्ही पॕनलमधील उमेदवार प्रयत्नशील आहे.
मातब्बर रिंगणात
जि.प.चे माजी सदस्य व संस्थेचे विद्यमान अध्यक्ष विकास पंडित पाटील, पं.स.चे माजी सभापती रवींद्र चुडामण पाटील, पं.स.चे माजी सदस्य व उंबरखेडचे लोकनियुक्त सरपंच केदारसिंग पाटील, विद्यमान सचीव उदेसिंग पाटील, चाळीसगावचे नगरसेवक भगवान पाटील, डॉ. उत्तमराव महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काही अपक्षही नशिब आजमवित आहे. सर्वसाधारण गटात सर्वाधिक चुरस आहे. महिला, भटक्या - विमुक्त जमाती, अनुसूचित जाती - जमाती, इतर मागास प्रर्वग गटात मात्र समोरासमोर सरळ लढत होत आहे.
सोमवारी उंबरखेडे येथेच मतमोजणी, १० टेबल
मतमोजणी सोमवारीच उंबरखेडे येथील संस्थेच्या वसतिगृहातील सभागृहात होणार असून, यासाठी १० टेबल लावण्यात येणार आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन गर्दी टाळून मतमोजणीची प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी २५ कर्मचा-यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंग गवळी यांनी दिली.