विविध रंगछटांसह पक्ष्यांच्या किलबिलाटाने बहरला सातपुडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:28 AM2021-03-13T04:28:03+5:302021-03-13T04:28:03+5:30
जळगाव : वसंत ऋतुत पळस, पांगारा, काटेसावर, सोनसावर आलेला फुलोरा म्हणजे पक्षी निरीक्षण व छायाचित्रणाची पर्वणी. फुले- पक्षी ...
जळगाव : वसंत ऋतुत पळस, पांगारा, काटेसावर, सोनसावर आलेला फुलोरा म्हणजे पक्षी निरीक्षण व छायाचित्रणाची पर्वणी. फुले- पक्षी यांचा आंतरसंबंध अभ्यासण्याची सुवर्णसंधी याकाळात पुष्प-पक्षी अभ्यासकांना मिळते. फुलांच्या जीवनक्रमातील परागीभवन या महत्त्वपूर्ण टप्प्याची पूर्तता व पक्ष्यांना उष्ण व कोरड्या ऋतुत मिळणाऱ्या मकरदांच्या, मधुरसाच्या आस्वादातून होणारी तृष्णापूर्ती या दोन्हीतून सिद्ध होणारा पुष्प-पक्षी यांच्यातील परस्पर संबंध सध्या या फुललेल्या झाडांवर बघायला मिळत आहे. वसंत ऋतू म्हणजे निसर्ग रंगांच्या उधळणीचा काळ. विविधरंगी फुले (पळस, पांगारा, काटेसावर, सोनसावर, काकड, मोहई, हुंब, कुसूम) व तितकेच नानाविध रंगलेले सुतार, जेडॉनचा पर्णपक्षी, सातभाई, तुईया, किरपोपट, टिट, चष्मेवाला, कोतवाल इ. पक्षी यांच्या विविधरंगी छटा आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्या आहेत, वन्यजीव संरक्षण संस्थेचे वनस्पती व पक्षी अभ्यासक प्रसाद सोनवणे व राहुल सोनवणे या जोडीने.
एकीकडे मानवी हव्यासामुळे कृत्रिम वणव्यात होरपळून निघणारा सातपुडा व दुसरीकडे निसर्गाची ही आश्वासक, मनमोहक रंगांची उधळण अशा दोन टोकाच्या परिस्थिती अनुभवणारा सातपुडा नक्कीच मानवाला निसर्ग संवर्धन व संरक्षणाची प्रेरणा देत आहे.