सत्ता भाजपची तरीही शिवसेना नगरसेवकांच्या वाॅर्डातून योजनेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:30 AM2021-02-21T04:30:34+5:302021-02-21T04:30:34+5:30
जळगाव : जळगाव महापालिकेत सत्ता भाजपची आहे. अमृत योजनेचा शुभारंभ ज्या वाॅर्डातून होत आहे त्या वाॅर्डात दोन्ही नगरसेवक शिवसेनेचे ...
जळगाव : जळगाव महापालिकेत सत्ता भाजपची आहे. अमृत योजनेचा शुभारंभ ज्या वाॅर्डातून होत आहे त्या वाॅर्डात दोन्ही नगरसेवक शिवसेनेचे आहेत. तरीही आम्ही भेदभाव न करता योजनेचा शुभारंभ करीत आहोत. सेना व भाजपचे नगरसेवक या ठिकाणी असल्याने युती असल्यासारखे वाटतेय. भविष्यात काय दडलंय हे कुणीच सांगू शकत नाही. त्यामुळे भविष्यात सेना व भाजपची पुन्हा युती होऊ शकते, असे सूतोवाच माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सुप्रीम काॅलनीत शनिवारी अमृत योजनेतंर्गत नव्याने टाकण्यात आलेल्या पाईपलाईनच्या शुभारंभावेळी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात राजकीय टोलेबाजी रंगली.
आमदार गिरीश महाजन उवाच..
१) सुप्रीम कॉलनीत शिवसेनेचे तीन नगरसेवक आहेत. भाजपचा एकही नगरसेवक नाही. मनपात ६० नगरसेवक भाजपचे तर १५ नगरसेवक शिवसेनेचे आहेत. मात्र, तरीदेखील आम्ही भेदभाव न करता शिवेसना नगरसेवकांच्या वाॅर्डातून अमृतच्या पाणी पुरवठ्याचा शुभारंभ करीत आहोत. हे महाराष्ट्रातील अत्यंत आदर्श उदाहरण आहे. मात्र राज्यस्तरावर असा मोठेपणा दाखविला जात नाही.
२) जळगाव शहराच्या विकासासाठी कोरोना काळातही भाजप व शिवसेना नगरसेवक अशा सर्वांनासोबत घेऊन काम करीत आहोत.
३)आजही विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेत आम्हाला राष्ट्रवादी अन् काँग्रेस दिसत आहे.
४) गुलाब भाऊ जे खरे आहे, तेच आम्हाला सांगा.. काहीही बोलू नका, कारण एकदा का तुमची बॅटरी सुरू झाली की, तुम्ही आवरले जात नाहीत.
पालकमंत्री गुलाबराव पाटील उवाच...
१) गिरीश महाजन यांनी मनपात कशा पद्धतीने सत्ता घेतली. इतका मोठा नगरसेवकांचा आकडा कसा गाठला, हे आपल्याला माहिती आहे.
२) गिरीश महाजन नसते, तर भाजपला मनपात १५ जागाही मिळाल्या नसत्या.
३) आमच्याकडे जर रसद पुरविली असती, तर आम्हीही चांगल्या जागा मिळविल्या असत्या.
४) वाघूरचे पाणी हे जामनेर मतदारसंघातून येत असले तरी ते जळगाव ग्रामीण मतदारसंघातून वाहत असते. जर आमचे पाणी तुमच्या धरणात आले नाही, तर तुमचे धरण कसे भरणार.
५)गेल्या वेळी तुमच्याकडे जलसंपदा खाते होते. म्हणजे पाणीवालेच होते. आता मी पण पाणीवालाच आहे. फरक इतकाच आहे, की तुम्ही चारी वाटे पाणी देत होते आणि आम्ही पाईपावाटे पाणी देत आहोत.
६) राज्यात सेना व भाजपची युती झाली असती तर भाजपने जळगाव महापालिकेत सत्ता आल्यानंतर आमच्यासोबत ‘लव्ह मॅरेज’ केलं असते.