भुसावळात कर्जदाराला बनावट नोटिसा दिल्याप्रकरणी संतोषीमाता पतसंस्थेचे चेअरमन वासुदेव इंगळेंसह एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 10:19 PM2018-11-05T22:19:16+5:302018-11-05T22:20:26+5:30

भुसावळ येथील माजी उपनगराध्यक्ष तथा संतोषीमाता पतसंस्थेचे चेअरमन वासुदेव आनंदा इंगळे तसेच संचालक मंडळ, वसुली अधिकारी व तत्कालीन सहाय्यक निबंधक यांनी बनावट कागदपत्रे तयार करून सहाय्यक निबंधक कार्यालयात खोटा शिक्का तयार करून खोट्या नोटिसा देऊन फसवणूक केल्याची फिर्याद कर्जदार महिलेचे पती रवींद्र नारायण भोळे यांनी जळगाव येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे केली. त्यामुळे गुन्हे शाखेने बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे तर चेअरमन वासुदेव इंगळे व वसुली अधिकारी प्रशांत लक्ष्मण भारंबे यांना अटक करण्यात आली आहे.

Satusimata Credit Society Chairman Vasudev Ingle and one arrested with fake notices given to the borrower in the past. | भुसावळात कर्जदाराला बनावट नोटिसा दिल्याप्रकरणी संतोषीमाता पतसंस्थेचे चेअरमन वासुदेव इंगळेंसह एकास अटक

भुसावळात कर्जदाराला बनावट नोटिसा दिल्याप्रकरणी संतोषीमाता पतसंस्थेचे चेअरमन वासुदेव इंगळेंसह एकास अटक

Next
ठळक मुद्दे तत्कालीन सहायक निबंधकासह संतोषीमाता पतसंस्थेच्या संचालक मंडळावरही गुन्हे दाखलजळगाव येथील आर्थिक गुन्हे शाखेची भुसावळ येथे कारवाईसंतोषीमाता पतसंस्थेकडून कुणाची फसवणूक झाली असल्यास गुन्हा आर्थिक शाखेकडे फिर्याद द्या, असे आवाहन पथकाकडून करण्यात आले आहे.

भुसावळ, जि.जळगाव : येथील माजी उपनगराध्यक्ष तथा संतोषीमाता पतसंस्थेचे चेअरमन वासुदेव आनंदा इंगळे तसेच संचालक मंडळ, वसुली अधिकारी व तत्कालीन सहाय्यक निबंधक यांनी बनावट कागदपत्रे तयार करून सहाय्यक निबंधक कार्यालयात खोटा शिक्का तयार करून खोट्या नोटिसा देऊन फसवणूक केल्याची फिर्याद कर्जदार महिलेचे पती रवींद्र नारायण भोळे यांनी जळगाव येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे केली. त्यामुळे गुन्हे शाखेने बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे तर चेअरमन वासुदेव इंगळे व वसुली अधिकारी प्रशांत लक्ष्मण भारंबे यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
फिर्यादी रवींद्र भोळे यांच्या पत्नी संगीता भोळे यांनी संतोषी माता अर्बन संस्थेतून कर्ज घेतले आहे. या कर्जवसुलीसाठी संस्थेचे चेअरमन इंगळे व संचालक मंडळ यांनी वसुली अधिकारी प्रशांत भारंबे व तत्कालीन सहायक निबंधक गिरीधर फुलाजी अहिरे यांना हाताशी धरून संगनमताने कट कारस्थान रचले व फिर्यादी भोळे किंवा त्यांची पत्नी संगीता भोळे यांना कोणतीही नोटीस न देता किंवा वसुली अधिकारी यांना अधिकार नसताना त्यांनी भुसावळ येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात जाऊन महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम सन १९६० चे कलम १०१ प्रमाणे दाखला (नोटीस ) लिहून त्यावर सहायक निबंधक या नात्याने बनावट सही केली व संस्थेचा गोल व आडवा शिक्का वापरून खोटा दाखला तयार केला व तो खरा आहे, असे भासवून जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सादर केला. त्या नोटीसचा अनधिकृतपणे उपयोग केला.
त्यानंतर चेअरमन इंगळे व संपूर्ण संचालक मंडळ, वसुली अधिकारी भारंबे व तत्कालीन सहाय्यक निबंधक आहिरे यांनी संगनमत करून कट कारस्थान केले व पुरावा नष्ट केला. त्यामुळे संबंधितावर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बाजारपेठ पोलीस स्टेशनला भाग पाच, गु.र.नं. १६१/१८, . कलम ४६८, ४६५, ४६७, ४७१, १२० (ब), १६७, १६८, १८२, २०१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. चेअरमन वासुदेव इंगळे व वसुली अधिकारी भारंबे यांना अटक केली आहे.
ही कारवाई जळगाव येथील आर्थिक गुन्हा शाखेचे एपीआय मंजीतसिंह चव्हाण, मन्सूर शेख, शफी पठाण, पोलीस नायक सुनील सोनार, श्रीकृष्ण सपकाळे, वसीम शेख, सुभाष शिंदे, किशोर काळे आदींच्या पथकाने केली आहे.

ठेवीदारांच्या कष्टाच्या रकमा हडप करून गडगंज संपत्ती कमविणाऱ्या पतसंस्था चालकांविरुद्ध ही सुरुवात असून, इतर सदस्यांनाही पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. लवकरच त्यांच्यावरही गुन्हा दाखल होतील. - प्रवीणसिंह पाटील, अध्यक्ष, खान्देश ठेवीदार कृती समिती, जळगाव.

पतसंस्थेत ठेवलेल्या ठेवीदारांच्या रकमा प्रकरणी अनेक अर्ज आलेले आहेत. सर्व बाजू तपासून गुन्हा दाखल करण्याचे काम करण्यात येईल. कुणाचीही गय केली जाणार नाही. - गजानन राठोड, डीवायएसपी, भुसावळ.

 

Web Title: Satusimata Credit Society Chairman Vasudev Ingle and one arrested with fake notices given to the borrower in the past.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.