सेवाव्रती मीरा कुलकर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 07:09 PM2018-03-11T19:09:58+5:302018-03-11T19:09:58+5:30
केशवस्मृती प्रतिष्ठान आणि जळगाव जनता सहकारी बँकेतर्फे दिला जाणारा पुरस्कार यंदा वैयक्तिक गटात मूळच्या जळगावच्या व गेली २० वर्षे आसाममध्ये सेवा कार्य करणाºया मीरा रघुनाथ कुलकर्णी यांना जळगाव येथे ४ मार्च रोजी दिला जाणार आहे. त्यांच्या निस्पृह सेवा कार्याचा, त्यांचे समकालिन डॉ. ज्ञानदेव नीलवर्ण यांनी घेतलेला हा आढावा.
जळगाव येथील विवेकानंद केंद्राच्या कार्याची सुरुवात १९९२ साली झाली. केंद्राच्या पहिल्या युवा प्रेरणा शिबिरात मीरा कुलकर्णी शिबिरार्थी म्हणून उपस्थित होती. शिबिरातील वागणे, सहभाग आणि एकंदरीत देशभक्ती व देशप्रेम याबद्दलचा चर्चासत्रातील सहभाग, मतप्रदर्शन आणि आपण भारत मातेसाठी काही केले पाहिजे या तळमळीने तिची आम्हास एक वेगळी ओळख झाली. तिच्या या शिबिरापासूून ती विवेकानंद केंद्राची सक्रिय कार्यकर्ती झाली.
त्या वेळी जळगाव येथे बालसंस्कार, वाचन संस्कार वर्ग, ओंकार ध्यान, भजनसंध्या, शालेय व्यक्तिमत्त्व विकास शिबिर, युवा प्रेरणा शिबिर, योग, प्राणायाम वर्ग, भारतीय संस्कृती परीक्षा, समता नगर वाचनवर्ग इत्यादी कार्यक्रम वर्षभर चालत. हे सर्व उपक्रम मीरा व इतर युवा कार्यकर्त्यांमुळे यशस्वी होऊ शकले. अशा या कार्यक्रमांनी मीरा ही केंद्राच्या कार्यात सक्रिय झाली. रवी कुलकर्णी व मीरा हे जळगाव येथे जनता सहकारी बँकेच्या ओंकारेश्वर शाखेच्या इमारतीत अनेक वर्षे योगासन वर्ग घेत असत.
मीरा ही मू.जे. महाविद्यालयाची व विशेषत: प्राचार्य अनिल राव सरांची वाणिज्य शाखेची आवडती व हुशार विद्यार्थिनी. मीरा उत्तर महाराष्टÑ विद्यापीठात एम.कॉम.ला द्वितीय आली आणि तिने आयसीडब्ल्यूएचा एक ग्रुपही पूर्ण केला. परंतु तिला आपल्याकडील गुणवत्तेने चांगल्या पगाराची नोकरी करण्याची इच्छा नव्हती. सातत्याने डॉ. अविनाश आचार्य व प्राचार्य राव सरांच्या बैठकीत हा विषय व्हायचा. मीरा केंद्राच्या कार्यात स्थिरावली. १९९७ साली विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे उपाध्यक्ष बालकृष्णन हे जळगावी आले. पिंपळदचा कार्यक्रम झाल्यानंतर जळगावला परत निघताना, मीराने ललितातार्इंना मिठी मारली आणि रडत म्हणाली, ‘मला जीवनव्रत्ती व्हायचे आहे, पूर्ण वेळ काम करायचे आहे. भारत मातेची सेवा करण्यासाठी माझा जन्म झाला आहे. मला कन्याकुमारीला येथूनच जायचे आहे. तिचा देशसेवेचा हा निर्णय स्तुत्य होता. हा प्रसंग डॉ. अविनाश आचार्य दादांना सांगितला. ते दादा म्हणाले, तू काळजी करू नको. आपण तेथे तिची काही व्यवस्था करू. तत्काळ दादांनी तिला बँकेत आॅडिट आॅफिसर म्हणून नोकरी दिली. पण ती नोकरीच्या पाशात रमणारी मुलगी नव्हती. एक दिवस ती आॅडिटनिमित्त भुसावळला गेली. तेथून सरळ रेल्वेने तिने कन्याकुमारी गाठले. जीवनव्रती, पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कार्य सुरू केले. आज तिचे आसाम येथील प्रांत संघटक, चहाच्या मळ्यातील कामगारांच्या मुलांचे शिक्षण, केंद्राच्या शाळा, लोकसहभागातून कामे, राष्टÑीय पातळीवरील तिची जबाबदारी पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्मृती इराणी यांनी दिल्लीहून बोलावून विशेष कार्यक्रमात सहभागी केले. तिचे हे काम आमच्यासाठी विशेषत: जळगावकरांसाठी भूषणावह आहे.
-डॉ. ज्ञानदेव नीलवर्ण, परीक्षा नियंत्रक, एमआयटी विद्यापीठ, पुणे