कारला वाचविण्यासाठी लावला अर्जंट ब्रेक, ट्रालीचे हुक तुटून ट्रॅक्टर उलटल्याने चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 12:33 PM2020-02-29T12:33:01+5:302020-02-29T12:33:35+5:30
महामार्गावर अपघातांची मालिका
जळगाव : चारा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने समोरून भरधाव ओव्हरटेक करत येणाºया कारला वाचविण्यासाठी अर्जंट ब्रेक मारला. त्यात ट्रॉलीचा हूक तुटून चक्क ट्रॅक्टर उलटून त्या खाली दबल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास विद्यापीठाच्या प्रवेशद्वाजवळ महामार्गावर घडली.
दीपक जगन्नाथ महाजन (३०, रा़ आंचळगाव ता़ भडगाव) असे मृत ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे़ दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी कार सोडून कार चालक फरार झाला होता तर कारचे एका बाजूने नुकसान झाले होते़
आंचळगाव येथील महारू पाटील यांनी ममुराबाद येथून विकत घेतलेला कडब्याचा चारा घेऊन जाण्यासाठी दीपक आणि त्याचा चुलत भाऊ मोहन रमेश महाजन हे वेगवेगळ्या ट्रॅक्टरने शुक्रवारी सकाळी ममुराबाद येथे आले होते. दुपारच्या सुमारास चारा घेऊन दोन्ही ट्रॅक्टर गावाकडे परतण्यासाठी निघाले़ दोघे ट्रॅक्टर एकामागे एक असे चालत होते़ त्याचबरोबर महारू पाटील हे सुध्दा दुचाकीवरून मागून येत होते़
ओव्हरटेक करत आली कार
दीपक हा ट्रॅक्टर क्रमांक एमएच १९़ बीजी ५२३७ हे चालवत होता. तर त्याच्या मागे चुलत भाऊ मोहन दुसरे ट्रॅक्टर चालवत होता. विद्यापीठाजवळून जात असताना पाळधीकडून भरधाव वेगाने कार (एमएच़२९़ बीवाय़४५००) येत होती़ त्यात त्या कारने भरधाव वेगात मालवाहतूक चारचाकी चाकीला ओव्हरटेक केले. दरम्यान, ही कार ट्रॅक्टरवर धडकेल म्हणून दीपकने अर्जंट ब्रेक दाबला. यात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा हूक तुटला आणि ट्रॉली चक्क दोन चाकांवर उभी राहीली़
२० ते ३० फुटापासून मारला ब्रेक
समोरून ओव्हरटेक करत येत असलेली कार दिसताच दीपक त्याने कारला वाचविण्यासाठी तब्बल वीस ते तीस फुटापर्यंत ब्रेक लावून धरला होता़ मात्र, भरधाव कारमुळे अपघात झाला़ अपघात एवढा भिषण होता की, ट्रॅक्टरचे चाक सुध्दा फुटले व ट्रॅक्टरच्या काही भागांचा चुराडा झाला होता़
वडील रुग्णालयातच झाले बेशुद्ध
दीपकचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी गावात वाºयासारखी पसरली. दीपकचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन कक्षात ठेवला होता. वडील जगन्नाथ महाजन, भाऊ देवानंद, मावशी इंदूबाई, मावसभाऊ रवींद्र हे रुग्णालयात आले होते. घरातील कर्ता मुलगा गेल्याने कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. वडील बाहेरच बसून रडत असताना ते अचानक बेशुद्ध पडले. त्यांना लागलीच उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले.
दोन्ही मुले झाली पोरकी
दीपक महाजन याच्या पश्चात आई वत्सलाबाई, वडील जगन्नाथ, पत्नी भावना, मुलगा लकी (५) व हितेश (दीड वर्ष), भाऊ देवानंद असा परिवार आहे. दीपक हा घरातील मोठा मुलगा आहे.
ट्रॅक्टर उलटताच चालक दाबला गेला
ट्रॉलीचा हुक तुटल्यानंतर ट्रॅक्टर आणि कारची धडक झाली़ अन् क्षणात ट्रॅक्टर उलटे झाले़ त्या ट्रॅक्टरखाली दबून दीपक महाजन याचा जागीच मृत्यू झाला़
महामार्गावर वाहतूक ठप्प
ट्रॅक्टर आणि कारच्या अपघातानंतर महामार्गावरील दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प झाली होती़ त्यानंतर तालुका पोलीस अरूण निकुंभ यांच्यासह वाहतूक पोलिसांनी त्वरित घटनास्थळी जावून क्रेनच्या सहाय्याने कार आणि ट्रॅक्टरला रस्त्याच्या बाजूला केले़ नंतर वाहतूक सुरळीत केली़ ट्रॅक्टर उलटल्यामुळे संपूर्ण डिझेल हे रस्त्यावर पडलेले होते़ यावेळी धनश्याम पवार, प्रदीप बडगुजर, सुनील पाटील, हितेश पाटील, चंद्रकांत पाटील या पोलिसांची उपस्थिती होती़