महिला शिक्षणदिनी व्हिडिओद्वारे होईल सावित्रीबाईंचे जीवन दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 07:05 PM2020-12-27T19:05:52+5:302020-12-27T19:07:35+5:30
सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे.
भुसावळ : सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. त्याला अनुसरून सावित्रीबाईंच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची महती जिल्हाभरातील विद्यार्थी व्हिडिओद्वारे सादर करणार आहेत. त्या माध्यमातून सावित्रीबाईंचे जीवन दर्शन घडणार असल्याचे वंशिका प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक नरवाडे यांनी सांगितले.
भुसावळ येथील वंशिका प्रतिष्ठानतर्फे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विद्यार्थी व युवकांसाठी घरबसल्या व्हिडिओ वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. येत्या ३० डिसेंबरपर्यंत आपापल्या वक्तृत्वाचे व्हिडिओ पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रथम गट तिसरी ते चौथी असून वेळ ३ मिनिटे आणि विषय मी सावित्री बोलतेय असा आहे. द्वितीय गट पाचवी ते सातवी असून वेळ ३ मिनिटे आणि विषय महिला शिक्षक : सावित्रीबाई फुले असा आहे. तृतीय गट आठवी ते दहावी असून वेळ ४ मिनिटे आणि विषय सावित्रीबाई फुले व आजची स्त्री असा आहे. चतुर्थ गट अकरावी ते खुला असून वेळ - ५ मिनिटे आणि विषय - सावित्रीबाईंनी केलेली शैक्षणिक व सामाजिक क्रांती असा आहे. दि. 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंतीदिनी बक्षीस होईल. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना बक्षिसासाठी कळविण्यात येईल आणि उर्वरित सहभागींना व्हॉट्सअपद्वारे सहभाग प्रमाणपत्र पाठवण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्वाचा व्हिडिओ पाठवून स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे.