धरणगावात प्रकटल्या सावित्रीच्या लेकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 02:11 PM2021-01-03T14:11:51+5:302021-01-03T14:12:58+5:30
सावित्रीबाई फुले जयंतीदिनी धरणगावात अनोखा उपक्रम झाला.
धरणगाव : नगरपालिका व महात्मा फुले युवा क्रांती मंच यांच्यातर्फे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ८० शिक्षिकांना सावित्रीबाईंचे पुस्तक, पेन, गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या सर्व महिलांना साडी भेट देऊन त्यांचा सन्मान केला.
नगरपालिका व सामाजिक संघटना महात्मा फुले युवा क्रांती मंच यांच्यातर्फे धरणगाव शहरातील सर्व शाळांमध्ये शिकविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान सोहळा सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने करण्यात आला. इयत्ता पहिलीपासून ते पदव्युत्तरपर्यंत शिक्षण देणाऱ्या ८० महिलांचा सत्कार या ठिकाणी पार पडला. पालकमंत्री गुलाबराव पाटील, व्याख्याते दर्शना पवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्षा उषा वाघ, नगराध्यक्ष नीलेश चौधरी, युवा क्रांती मंच महिला अध्यक्षा प्रा.कविता महाजन, उपनगराध्यक्षा कल्पना विलास महाजन, महिला बालकल्याण सभापती सुरेखा विजय महाजन व्यासपीठावर उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. स्त्रिया आज सर्व क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगती करत आहेत याचे सर्व श्रेय सावित्री आईंना जाते, असे उद्गार मंत्री गुलाबराव पाटील यांनी काढले.
सत्कारार्थींमधून प्रा. ज्योती महाजन, ज्योती जाधव, संगीता न्हायदे, प्रियंका गजरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रस्तावना प्रा. कविता महाजन, सूत्रसंचालन रुपाली प्रभाकर पाटील, देवश्री रमेश महाजन, कुंदबाला नरेंद्र पाटील यांनी केली .नगरसेविका कीर्ती मराठे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे सर्व नियोजन महिलांनी केले.