सावित्रीच्या लेकिंची गगण भरारी, तीन जणींच्या हाती ‘कायद्याची काठी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 10:49 PM2019-03-13T22:49:15+5:302019-03-13T22:49:37+5:30
मटकी विक्रेत्या पित्याच्या ‘लक्ष्मी’ची पावले पोलीस दलात
जळगाव : प्रतिकूल परिस्थिती असो की संसाराची जबाबदारी, या सर्व पातळीवर यशस्वी होत जिल्ह्यातील तीन जणींनी प्रचंड चिकाटी, जिद्द या बळावर लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण होत पोलीस उपनिरीक्षक होण्याचा मान मिळविला आहे. विविध क्षेत्रात गगणभरारी घेणाऱ्या सावित्रीच्या लेकींनी आता कायद्याटी काठीदेखील हाती घेत पालकांचे स्वप्न सत्यात उतरविले आहे.
पहूर, ता. जामनेर /एरंडोल
जामनेर तालुक्यातील पहूर येथील कसबेतील रहिवासी सुरेश दामू करंकार यांची बिकट परिस्थिती असल्याने कुटुंबाचा उदारनिर्वाह चालविणे व मुलांचे शिक्षण करणे जिकरीचे होते. पण मुलांना शिकविण्यासाठी जिद्द असल्याने गावात मटकी विक्री करून मुलांना उच्च शिक्षित केले. अशा प्रतिकूल परिस्थितीतून त्यांची कन्या लक्ष्मीचे पावले पोलीस दलात पडले आहे. वडील सुरेश करंकाळ यांनी गावात दररोज सकाळी मटकी विक्री करून लक्ष्मीला शिक्षण देण्याचे काम सुरू ठेवले. या सोबतच लक्ष्मी कंरकाळ यांनी प्रतिकूल परिस्थितीत स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू ठेवली पोलीस उपनिरीक्षक होण्याचे धेय्य गाठले.
सासरच्यांकडून प्रेरणा
लक्ष्मीच्या खडतर प्रवासात आई वडिलांबरोबरच सासरच्या मंडळींचा विशेष करून पती राहुल अशोक चौधरी यांचा सिंहाचा वाटा आहे. लक्ष्मी करंकाळ यांचा विवाह नऊ महिन्यांपूर्वी एरंडोल येथे झाला. सासरच्यांनी लक्ष्मी यांची मेहनत पाहून त्यांना या परीक्षेसाठी प्रेरणा दिली.
पहूर येथे लक्ष्मीचा नागरी सत्कार
पहूर, ता. जामनेर - पोलीस उप निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल लक्ष्मी सुरेश करंकार यांचा कसबे ग्रामपंचायतच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाट होते. लक्ष्मी करंकार यांचे वडील सुरेश करंकार, आई चंद्रकला करंकार यांच्यासह अमोल पांढरे, राहुल सोनवणे, संदेश काळे यांची भारतीय सैनिक दलात निवड झाल्याबद्द सन्मान करण्यात आला. यावेळी पेठ सरंपच नीता पाटील, पं.स.सदस्या पूजा भडांगे, कसबेचे उपसरपंच योगेश भडांगे, पेठचे माजी सरंपच प्रदीप लोढा, गटविकास अधिकारी अजय जोशी, सहायक गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, माजी जि.प. सदस्य राजधर पांढरे, माजी पं.स.सभापती बाबुराव घोंगडे, उत्तर महाराष्ट्र धनगर समाज संघर्ष समिती प्रमुख रामेश्वर पाटील, अॅड. संजय पाटील, विकासो कसबे चेअरमन सुधाकर घोंगडे आदी उपस्थित होते.
कजगावच्या लेकीची वाजत-गाजत मिरवणूक
कजगाव, ता. भडगाव - येथील सेवानिवृत्त शिक्षक अशोक आनंदा सोनवणे यांची कन्या राजश्री सोनवणे यांनी लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून थेट पोलीस उपनिरीक्षक पदी मजल मारली आहे. विशेष म्हणजे कजगाव सारख्या मोठ्या गावातून आतापर्यंत कोणीही थेट लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासकीय सेवेत रुजू झाले नव्हते. मात्र राजश्री सोनवणे यांनी अथक परिश्रम घेऊन बुद्धीमतेच्या जोरावर राज्यातून अनुसूचित जातीच्या गटातून ५वा क्रमांक मिळविला.
राजश्री सोनवणे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून निवड झाल्याने गावात समाधानाचे व आनंदी वातावरण आहे. गावातील पहिलीच कन्या पोलीस उपनिरीक्षक झाल्याने त्यांची गावातून बसस्थानकपासूूून वाडे रोड पंचशील नगरमार्गे त्यांच्या घरापर्यंत उघड्या जीपमधून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. आपल्या या यशाबद्द बोलताना राजश्री सोनवणे यांनी सांगितले की, लहानपणापासून एक अधिकारी होण्याची इच्छा होती. त्यामुळे कठोर अभ्यास करून यश मिळवले. भविष्यात अजून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पोलीस उपअधीक्षक होण्याची इच्छा आहे.
अंकिताने केले गावाचे नाव मोठे
चोपडा - तालुक्यातील घोडगावची अंकिता एकनाथ बाविस्कर ही पहिली महिला पोलीस उपनिरीक्षक झाली आहे. घोडगाव येथील रहिवाशी व हातेड येथे पाटबंधारे विभागात उपनिरीक्षक म्हणून काम पाहणारे एकनाथ भिकारी पाटील व घोडगाव येथील अंगणवाडी सेविका संगीताबाई एकनाथ पाटील यांची मुलगी अंकिता एकनाथ बाविस्कर ही महाराष्ट्रातून (ओबीसी) तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. घोडगाव परिसरातून पहिली महिला पोलीस उपनिरीक्षक म्हणून गावाचे व परिसराचे नाव मोठे केले असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.