आदिवासी विकास निधीत सव्वाकोटीचा अपहार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 06:34 AM2019-03-19T06:34:49+5:302019-03-19T06:35:06+5:30
विविध विकास योजनांमध्ये २००५ ते २०१० या कालावधीत एक कोटी २० लाख चार हजार ८४५ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन पाच प्रकल्प अधिकारी, कर्मचारी आणि विविध एजन्सीच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
यावल (जळगाव) : येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत आदिवासींसाठी असलेल्या विविध विकास योजनांमध्ये २००५ ते २०१० या कालावधीत एक कोटी २० लाख चार हजार ८४५ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन पाच प्रकल्प अधिकारी, कर्मचारी आणि विविध एजन्सीच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यावल येथून नुकतेच अकोला येथे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणून बदलून गेलेले आर. बी. हिवाळे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अपहाराचा कालावधी २००५ ते २०१० असून यात पाच प्रकल्प अधिकारी व तत्कालीन कर्मचारी व अन्य एजन्सी यांच्यावर एक कोटी २० लाख ४ हजार ८४५ रुपयांच्या रकमेच्या अपहाराचा ठपका ठेवला आहे. संशयितांमध्ये तत्कालीन प्रकल्प अधिकारी तारासिंग पाडवी, एन. एम. निकुंभे, जी.एन. वळवी, टी. बी. पाडवी, एस. ई. उमाळे, ए. एम. थोरात, जी. एन.वळवी यांच्यासह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याप्रकरणी शासनाने निवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नियुक्त केली होती. समितीने शासनाकडे सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, ज्या शासकीय अधिकाऱ्यांनी रकमेचा अपहार केला आहे. त्यांच्याविरूद्ध तेथेच गुन्हे नोंदवण्यात यावे.