तेरी शहनाई बोले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 01:23 AM2018-07-01T01:23:25+5:302018-07-01T01:24:53+5:30
जळगाव आकाशवाणी केंद्राच्या सेवानिवृत्त ज्येष्ठ उद्घोषिका डॉ.उषा शर्मा ‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘शास्त्रीय वाद्य संगीत आणि रजतपट’ यावर आधारित लेखमाला लिहिणार आहे. त्यातील पहिल्या भागात आज त्या प्रसिद्ध शहनाई वादक पंडित बिसमिल्ला खाँ यांच्याविषयी लिहिताहेत...
मी शास्त्रीय संगीत शिकले नाही... मला त्यातील उमजही नाही, मात्र लहानपणी घरात मिळालेलं वातावरण आणि त्याला पोषक ठरलेल्या आकाशवाणीमुळे कानसेन निश्चित बनले. पाश्चात्य संगीत, हिंदुस्तानी आणि कर्नाटकी शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, लोक संगीत समजायला- आवडायला लागलं... त्यांच्याशी निगडित उद्घोषणा देताना आनंदित व्हायचे- जशी पहिल्या सभेची आरंभिक उद्घोषणा ५ वाजून ५५ मिनिटं होताहेत, आमची प्रात:कालीन सभा मंगल वाद्यानं सुरू होत आहे... खूपदा वाराणसीच्या विश्वनाथ मंदिरात पोहोचल्याचा भास व्हायचा... आणि चित्र प्रखर व्हायचं. ‘उस्ताद बिसमिल्ला खाँ... डोळे मिटून सुरांची आराधना करताहेत.’
‘कमरुद्दीन’ या मूळ नावाला बगल देणाऱ्या त्यांच्या आजोबांनादेखील मी प्रणाम करायचे... कारण दिनारंभाचा इतका प्रसन्न श्रीगणेशा (बिसमिल्ला) व्हायचा... अजूनही होतोच आहे.’
त्याच सभेत पुष्कळदा त्यांच्या सनईवादनाचा अर्धा तास असला की सोने पे सुहागा... आणि एखाद्या वेळी ‘गीतबहार’मध्ये चित्रपट ‘गूँज उठी शहनाई’ वाह! क्या बात हे। इराण, इराक, अफगाणिस्तान, जपान अमेरिका, म्हणजे जगभर आपले कार्यक्रम, मैफिली गाजवून हा कलाकार ‘स्वदेस’ यायचा तर आमचीच मान उंच व्हायची. ए.आर.रहमान यांनी विनंती केली आणि त्यांनी दुसरा हिंदी चित्रपट स्वीकारला आणि ‘ये जो देस है मेरा’ या गीतात एक अफलातून तान बहाल केली-! उत्सुकता वाटायची त्यांच्याबद्दल जाणून घ्यायची. मग पुस्तकं, मुलाखती आणि रेकार्डवरच्या कव्हर्सवर असणारी माहिती आम्हाला सुखावून जायची... कारण त्यावेळी ‘गुगल’ हा प्रकारच नव्हता. उस्ताद अली बख्श ‘विलायती’ हे त्यांचे मामा. त्यांचे गुरू- त्यांच्यासमवेत अनेक संगीत संमेलनं आणि मैफिली गाजवल्या. १९४७- स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांचं सनईवादन आयोजित केलं गेलं! तशी पंडित नेहरू यांची इच्छा होती- ‘आप कलाकार है’ आप आगे, आपके पीछे मैं और पूरा देश होगा’... हा ‘पूरा देश’ अजूनही त्यांच्या स्वरांचा मागोवा घेत आहे. ती सायंकाळ राग काफीच्या स्वरांनी बहरली आणि लोकांनी भारतीय संगीताच्या संत कबीराची ‘शान-ए-शहनाई’ अनुभवली.!
अत्यंत साधं जीवन जगणारा हा ‘भारतरत्न’ स्वत:चे कपडे स्वत: धुवायचा- बिना इस्त्रीचे परिधानही करायचा. पाच वेळेचा हा नमाजी सरस्वतीला वंदन करून सुरांची इबादत करायचा. तो म्हणायचा, ‘‘अमा तुम गाली दो बेशक, पर सुर में तो दो। गुस्सा आता है, बस उसपर जो बेसुरी बात करता है। पैसा खर्च करोगे तो खत्म हो जाएगा, पर सुर खर्च करके देखिए महाराज, कभी खत्म नही होगा....
तर, मी श्रोत्यांशी बोलत होते. ‘‘गूँज उठी शहनाई’ या चित्रपटातील खासियत, वैशिष्ट्ये सांगा. एका श्रोत्यानं सांगितलं, ‘राजेंद्रकुमार आणि अमिता यांच्या प्रमुख भूमिका होत्या.’ एकानं सांगितलं, वसंत देसाई यांचं संगीत. एखादा अभ्यासू रसिक गीतकार पं.भरत व्यास यांचा उल्लेख करायचा तर बसैये बंधूसारखे चित्र प्रदर्शनाचं वर्ष (१९५९) देखील..
वसंत देसाई यांनी दिग्गज गायकांप्रमाणे (म्हणजे लतादीदी, महंमद रफी, गीतादत्त) अत्यंत प्रतिभावान वादकांनादेखील सामिल केलं आणि या चित्रपटाच्या माध्यमातून उस्ताद बिसमिल्ला खाँ यांची शहनाई घरा-घरात पोहोचवली. याच चित्रपटात सतार आणि सनईची एक सुंदर जुगलबंदीही पेरण्यात आली. उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ आणि उस्ताद बिसमिल्ला खाँ यांनी पेश केलेली ती कदाचित रागमाला होती. ‘गूँज उठी शहनाई’ या चित्रपटातील गळीच गाणी कर्णमधूर. उदा. जीवन में पिया तेरा साथ रहे (राग जयजयवंती). दिल का खिलौना (राग भैरवी)... मात्र ‘तेरे सूर और मेरे गीत’ व ‘तेरी शहनाई बोले’ या गीतांमधली सनई अधिकच स्मरणात राहते. हा चित्रपट म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीत प्रेमींसाठी एक सांस्कृतिक ठेवा होय. त्यांना चित्रपट गीतंही आवडायची. सगळ्यात जास्त आवडीचं गीत होतं- ‘हमारे दिल से ना जाना, धोखा न खाना दुनिया बडी बेईमान...’
अत्यंत साधं, सुखी जीवन जगून उस्ताद २१ आॅगस्ट २००६ रोजी देहरुपानं विदा जरी झाले तरी त्यांची सनई, ते सूर अमर आहेत. दोन्ही चित्रपटांच्या आणि शास्त्रीय, उपशास्त्रीय वादनातून ते स्मरणात राहतील. जाणकार आणि आमच्यासारख्या सामान्य रसिकांच्या हृदयातील हा दर्दी रसिक एव्हढंच म्हणू शकेल-
तेरी शहनाई बोले,
सुनके जिया मेरा डोले,
जुल्मी काहे को सुनाए ऐसी तान रे !
- डॉ.उषा शर्मा, जळगाव