तू कोणाचीच होऊ शकत नाही म्हणत त्याने कापल्या स्वत:च्या हाताच्या नसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:11 AM2021-06-30T04:11:56+5:302021-06-30T04:11:56+5:30
जळगाव : तू कोणाचीच होऊ शकत नाही असे म्हणत एका लाला नावाच्या तरुणाने (काल्पनिक नाव) तरुणीशी वाद घालत चाकूने ...
जळगाव : तू कोणाचीच होऊ शकत नाही असे म्हणत एका लाला नावाच्या तरुणाने (काल्पनिक नाव) तरुणीशी वाद घालत चाकूने स्वत:च्याच हाताच्या नसा कापल्या. रक्तबंबाळ झालेल्या लालाला पाहून घाबरलेल्या तरुणीने जिल्हा पेठ पोलीस ठाणे गाठले. दरम्यान, पोलीस त्याला घ्यायला गेले असता त्याने पळ काढला. पाठलाग करुन पोलिसांनी त्याला महामार्गानजीक पकडले. ही घटना मंगळवारी सायंकाळी रिंगरोडवर घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाला याचे एका १९ वर्षीय तरुणीशी एकतर्फी प्रेम आहे. लालाच्या म्हणण्यानुसार दोघांमध्ये दोन वर्षापासून प्रेमसंबंध आहेत. लाला हा आरोग्यदूत म्हणून काम करतो. तर तरुणी एका दवाखान्यात कामाला आहे. मंगळवारी ती बाहेर गावी जात असल्याचे समजल्यानंतर लाला याने रिंगरोडवर बहिणाबाई उद्यानासमोर गाठले. तेथे दोघांमध्ये शाब्दीक वाद झाला. त्यातून तरुणीने लाला याच्या कानशिलात लगावली. त्यामुळे चिडलेल्या लालाने हातातील चाकूने स्वत:च्या हाताच्या नसा कापून ‘मी तुला कोणाचीच होऊ नाही’ असे म्हणत धिंगाणा घातला. दरम्यान, रक्तबंबाळ अवस्थेत पाहून तरुणीने जवळच असलेले जिल्हा पेठ पोलीस ठाणे गाठून घटना कथन केली. पोलीस अमलदार अजित पाटील व प्रवीण भोसले यांनी तातडीने उद्यानपरिसर गाठून त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने पोलिसांना पाहून पळ काढला. या दोघांनी त्याचा प्रभात चौकापर्यंत पाठलाग केला. रस्ता ओलांडताना त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. तेथे त्याच्या आईला बोलावण्यात आले. रात्री साडे आठ वाजता त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर डाॅ.उल्हास पाटील रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी तरुणीचा जबाब घेतला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.