‘खरूज’म्हणजे आजार नाही, तर किड्यामुळे होणारा संसर्ग

By अमित महाबळ | Published: September 17, 2022 05:30 PM2022-09-17T17:30:23+5:302022-09-17T17:30:45+5:30

खरूज हा आजार किंवा रोग नसून तो एक प्रकारचा संसर्ग आहे. तो एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो.

'Scabies' is not a disease but an infection caused by a worm | ‘खरूज’म्हणजे आजार नाही, तर किड्यामुळे होणारा संसर्ग

‘खरूज’म्हणजे आजार नाही, तर किड्यामुळे होणारा संसर्ग

googlenewsNext

जळगाव - अनेकांना खरूज हा शब्द खाज एवढाच माहीत असतो. काहीजण इसम (eczema) याला खरूज म्हणतात पण खरे तर खरूज म्हणजे एका छोट्या किड्यामुळे शरीरावर झालेला संसर्ग असतो. हा किडा फक्त त्वचेवरच असतो आणि खाजेशिवाय तो शरीराला वेगळा काही त्रास देत नाही. पण त्यावर वेळीच उपाय न केल्यास जखमा होऊ शकतात. खरूज हा आजार किंवा रोग नसून तो एक प्रकारचा संसर्ग आहे. तो एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो.

काय आहे हा किडा?

पूर्वी हा किडा (Sarcoptes Scbiei Mite) फक्त प्राणी (पाळीव प्राणी - कुत्रा, मांजर) आणि जनावरांमध्ये आढळायचा, मात्र १७ व्या शतकात तो मानवी शरीरावर प्रामुख्याने दिसून आला. हा किडा डोळ्यांना न दिसणारा असून, एकदा संपर्क झाला की त्वचेच्या वरील भागात शिरून आपले घर तयार करतो. तो एका जागेवरून दुसऱ्या जागी जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्वचेवर काहीतरी फिरल्यासारखे वाटून खाज यायला लगते.

जळगावमध्ये ३० टक्के प्रमाण

- १० वर्षांवरील लहान मुलांमध्ये याचे लक्षण पूर्ण शरीरभर दिसून येते. १० वर्षांनंतर याची लक्षणे मानेच्या खाली पूर्ण शरीरावर आढळून येतात. हा संसर्ग शाळेतील मुलांमध्ये खूप जास्त प्रमाणात आढळून येतो. जळगावमध्ये याचे प्रमाण ३० टक्के आहे.

- कुटुंबातील एका व्यक्तीला खरूज झाली की त्या कुटुंबातील लहान मुलांना पहिल्यांदा संसर्ग होतो आणि मग इतरांना. कारण एकाच्या शरीरावरून दुसऱ्या शरीरावर हा किडा जातो.

संसर्ग कसा होतो?

- हा किडा सगळ्यात पहिल्यांदा जिथे दुमडलेली त्वचा असते तेथून पूर्ण शरीरभर पसरत जातो.
- सगळ्यात पहले लक्षण हे हाताच्या बोटांमध्ये, दुमडलेली त्वचा आणि मनगटावर दिसते.
- ‘एस’आकारचे व्रण, जे लालसर आणि पुटकुळ्यांसारखे वाटतात.
- पहिल्या १० दिवसांत या पुटकुळ्या पूर्ण शरीरभर दिसतात.

लक्षणे

- दिवस-रात्र कधीही याची खाज अंगाला येत राहते. पण अति खाजेमुळे त्वचेला जखम होऊ शकते.
- अंगाला लाल पुटकुळ्या येतात, सतत हात व त्वचा खाजवणे हे या रुग्णांमध्ये दिसते.

काय घ्यावी काळजी

- शरीराची स्वच्छता
- दररोज स्वच्छ पाण्याने आंघोळ
- घरातील पाळीव प्राण्यांची स्वच्छता
- पाळीव प्राण्यांना खरूज असेल तर ती ठीक होईपर्यंत घरातील त्यांचा वावर टाळणे.
- आपल्या घरात जर कोणाला खरूज झाली असेल तर त्याचे टॉवेल, साबण, कपडे, बेडशीट, अंथरूण, पांघरूण संसर्ग बरा होईपर्यंत सर्व वेगळे ठेवावे.

डॉक्टर म्हणतात 

खरूजचे योग्य निदान न करता काही व्यक्ती वेगवेगळे मलम, औषधी बाजारातून आणून स्वतःच्या मनाने लावतात आणि त्वचा अजून खराब करून घेतात. योग्य निदान हे फक्त त्वचारोग तज्ज्ञ करू शकतात. ज्ञानाला अनुभवाची जोड लागते. हा किडा एका दिवसात निघून जाणारा नाही. त्यामुळे त्वचारोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधी घ्यावीत व घरातील संसर्ग टाळावा, असे जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील त्वचारोग सल्लागार डॉ. कोमल गव्हाणे यांनी सांगितले.
 

Web Title: 'Scabies' is not a disease but an infection caused by a worm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव