अमळनेर तालुक्यात टंचाईची झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 09:34 PM2019-08-01T21:34:20+5:302019-08-01T21:34:49+5:30
अमळनेर : आॅगस्ट महिना सुरू झाल्यानंतरदेखील तालुक्यातील २७ गावांना अद्याप पाणी टंचाई जाणवत आहे. ९ गावांना ६ टँकरने पाणी ...
अमळनेर : आॅगस्ट महिना सुरू झाल्यानंतरदेखील तालुक्यातील २७ गावांना अद्याप पाणी टंचाई जाणवत आहे. ९ गावांना ६ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. तर १८ गावांना २१ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
गेल्या चार वर्षांपासून सतत दुष्काळी असलेल्या अमळनेर तालुक्याला पाऊस होऊन देखील आद्यप टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यात सरासरी वार्षिक ५८२ मिमी पाऊस अपेक्षित आहे. जुलै अखेरपर्यंत ५० टक्के २९१ मिमी पाऊस पडायला हवा होता. मात्र, फक्त २४१.७३ मिमी पाऊस पडला आहे. जून महिन्यात ५६ गावांना टंचाई होती. त्यापैकी सध्या गडखांब, मांजर्डी, धुपी, कचरे, नांद्री, नगाव बुद्रूक, हेडावे, सुंदरपट्टी, पिंपळी या ९ गावांना ६ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. १ शासकीय तर ५ खासगी टँकरद्वारे हा पुरवठा केला जात आहे. तसेच दहिवद खुर्द, सोनखेडी, मेहेरगाव, टाकरखेडा, पिंगळवाडे, रामेश्वर बुद्रूक, रामेश्वर खुर्द, खवशी, अंतुर्ली - रंजाने, जुनोने, तासखेडा, म्हसले, लोणे, दहिवद बुद्रूक, हिंगोने बुद्रूक, हिंगोने खुर्द, सावखेडा आदी १८ गावांना २१ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तापी नदीला पूर आल्याने तापी काठावरील गावांचा प्रश्न मिटणार आहे. मात्र अद्याप बोरी व पांझराला पुरेसे पाणी आले नसल्याने टंचाई जाणवत आहे.
सावखेडा व धावडे येथून टँकर भरले जात असून टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा केला जात आहे.
-अजय नष्टे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, अमळनेर
तालुक्यातील टंचाईचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. त्याप्रमाणे टँकरची मुदत आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.
- संदीप वायाळ, सहाययक गटविकास अधिकारी, पंचायत समिती अमळनेर