जळगाव जिल्हा रुग्णालयात औषधींचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:50 PM2018-04-22T12:50:01+5:302018-04-22T12:50:01+5:30

लोकल पर्चेससाठी निधीची अडचण

Scarcity of medicines in Jalgaon District Hospital | जळगाव जिल्हा रुग्णालयात औषधींचा तुटवडा

जळगाव जिल्हा रुग्णालयात औषधींचा तुटवडा

Next
ठळक मुद्देआठ ते नऊ महिन्यांपासून मनोरुग्ण औषधांपासून वंचित

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २२ - जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत झाल्याने आता आरोग्य विभागाकडून येणारा निधी यासाठी खर्च करता येत नसल्याने जिल्हा रुग्णालयात औषधींचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामध्ये गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून मनोरुग्णांना औषधी मिळत नसल्याच्या तक्रारीसह खोकल्याचीही औषधी उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे. दरम्यान, निधीअभावी लोकल पर्चेसही करता येत नसल्याचीही समस्या आहे, मात्र आपत्कालीन स्थितीत रुग्ण वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जात असल्याचे अधिकाऱ्यांच्यावतीने सांगण्यात आले.
जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत झाल्याने आता आरोग्य विभागाकडून येणारा निधी यासाठी खर्च करता येत नाही. त्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याची पूर्तताच सुरू असल्याने वैद्यकीय विभागाकडूनही सहजासहजी निधी मिळत नाही.
तसे पाहता आॅक्टोबर २०१७मध्ये जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे गेल्यानंतर जवळपास पाच महिने आरोग्य विभागाकडून औषधी, आॅक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. मात्र आता जिल्हाभरातील रुग्णालयांमध्येच सुविधा देण्यावर भर दिला जात असल्याने आरोग्य विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या रुग्णालयांमध्ये औषधी उपलब्ध करून दिली जात आहे. त्यात आता निधीदेखील संपल्याने वैद्यकीय शिक्षण विभागाकडे असलेल्या जिल्हा रुग्णालयाने त्यांनाच व्यवस्था करण्याचे कळविले. त्यामुळे आता वैद्यकीय शिक्षण विभागाकडून निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे.
मनोविकाराची औषधी नाही
गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून तर मनोविकारावरील औषधी संपल्याचे रुग्णांना सांगितले जात आहे. सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत ही औषधी वाटप केली जाते. त्यासाठी जिल्हा भरातील मनोरुग्ण येथे औषधी घेण्यासाठी येत असतात. मात्र औषधीच नसल्याने त्यांना माघारी परतावे लागते. तसेच ही औषधी बाहेरून खरेदी करा, असे सांगून ती लिहून दिली जाते, मात्र अनेकांची परिस्थिती नाजूक असल्याने त्यांचे हाल होतात. या संदर्भात शहरातील रामनगरातील रहिवासी असलेल्या एका जणाने सांगितले की, औषधीसाठी वारंवार चकरा मारल्या तरी औषधी मिळत नाही. या बाबत विचारले असता उद्धटपणे उत्तर दिले जाते, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या सोबतच खोकल्याचेही औषधी येथे उपलब्ध नाही.
वरिष्ठ पातळीवरील पुरवठ्यावर अवलंबून
केंद्रीय पद्धतीने औषधी खरेदी होऊन ती वरिष्ठ पातळीवरूनच पुरविली जाते. सध्या या पुरवठ्यात वरिष्ठ पातळीवरूनच अडचणी येत असल्याची माहिती मिळाली.
‘लोकल पर्चेस’साठीही निधी नाही
गेल्या दोन महिन्यांपासून विविध प्रकारच्या औषधी संपल्या असून ‘लोकल पर्चेस’साठीही निधी उपलब्ध नसल्याने अडचण येते. वैद्यकीय शिक्षण विभागाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने लोकल पर्चेस करता येत नसल्याची समस्या निर्माण झाली आहे.

वरिष्ठ पातळीवरून औषधींचा पुरवठा होतो. निधीची अडचण आहे, मात्र आपत्कालीन प्रसंगी रुग्णास आवश्यक औषधी तत्काळ उपलब्ध करून दिले जातात. रुग्णांची अडचण होणार नाही, याची दक्षता घेतली जाते.
- डॉ. बी.एस. खैरे, अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय.

Web Title: Scarcity of medicines in Jalgaon District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.