विविध भागांना कोरोनाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:15 AM2021-04-12T04:15:16+5:302021-04-12T04:15:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील बाधित रुग्ण वेगवेगळ्या परिसरात आढळून येत असून, नवीन परिसराचा रोज समावेश होत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील बाधित रुग्ण वेगवेगळ्या परिसरात आढळून येत असून, नवीन परिसराचा रोज समावेश होत आहे. विविध भागांना कोरोनाने विळखा घातला आहे. तपासण्यांची संख्या वाढली असली, तरी बाधितांची संख्या स्थिर असणे हा एक सकारात्मक संकेत असल्याचे आता डॉक्टरांकडून सांगितले जात आहे. दरम्यान, शहरात रविवारी २३३ नवे बाधित आढळून आले असून, ४ बाधितांचा मृत्यू झाला आहे.
शहरातील बाधितांचे मृत्यू थांबत नसून, सलग मृत्यूमध्ये वाढ होत आहे. रविवारी शहरातील ५० व ५८ वर्षीय पुरुष व ५० व ५८ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. यासह भुसावळ व जामनेर तालुक्यात प्रत्येकी ३, यावल तालुक्यात २, पारोळा, चाळीसगाव, धरणगाव, पाचोरा तालुक्यांत प्रत्येकी १ बाधिताचा मृत्यू झाला आहे. शहरातील खोटे नगरात सर्वाधिक ६ बाधित आढळून आले आहे. खोटेनगर सर्वात मोठे हॉटस्पॉट म्हणून समोर आले आहे. मात्र, या ठिकाणची रुग्णसंख्या घटली आहे. काही दिवसांपूर्वी या भागात दहापेक्षा अधिक रुग्ण एका दिवसात आढळून येत होते.
एकूण सक्रिय रुग्ण : ११,७५०
ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागणारी रुग्ण १,६८०
अतिदक्षता विभागातील रुग्ण : ६५१
झालेल्या तपासण्या : ८,७०७
आरटीपीसीआरचे आलेले अहवाल : २,३३६
आगारात ८ कर्मचारी बाधित
एसटी महामंडळातच्या जळगाव आगारात महापालिकेकडून दोन दिवस कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी मोहीम राबविण्यात आली. यात दोन दिवसांत ८ कर्मचारी बाधित असल्याचे समोर आले असून, त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांना सौम्य लक्षणे होती. गेल्या दोन दिवसांत ४३१ कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यात वाहक, चालकांचा समावेश आहे. दक्षता म्हणून ही तपासणी करण्यात आली. महापालिकचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय पाटील, तंत्रज्ञ राहुल निंबाळकर, सहायक ज्ञानेश्वर पाटील यांनी या तपासणी केल्या.