भंगार बाजारात पोलिसांकडून झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:15 AM2021-02-12T04:15:45+5:302021-02-12T04:15:45+5:30
जळगाव : चोरीच्या वाहनांची भंगार बाजारात विल्हेवाट लावली जात असल्याच्या संशयावरुन एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी दुपारी अजिंठा चौकात अचानकपणे झाडाझडती ...
जळगाव : चोरीच्या वाहनांची भंगार बाजारात विल्हेवाट लावली जात असल्याच्या संशयावरुन एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी दुपारी अजिंठा चौकात अचानकपणे झाडाझडती घेऊन भंगार विक्रेत्यांची चौकशी करण्यासह त्यांच्याकडे संशयास्पदरित्या आढळून आलेले ट्रक, इतर चारचाकीचे इंजिनसह दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. दरम्यान, या भागात कारवाई होत असताना दुसरीकडे नवीन बी.जे.मार्केट समोर बसणाऱ्या भंगार विक्रेत्यांनी भीतीपोटी आपलाच गाशा गुंडाळल्याचे दिसून आले. सतत गर्दीने फुलणारा हा परिसरात गुरुवारी मोकळा झाला होता.
गेल्या आठवड्यात नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत २७ लाख रुपये किमतीचे डंपर व इतर साहित्य चोरुन नेत त्याची भंगारात विल्हेवाट लावल्याचा प्रकार उघडकीस आला. यात भंगारमाफिया यासीन मुलतानी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याशिवाय द्रौपदी नगरात पडलेल्या दरोड्याच्या प्रकरणात चारचाकीचा वापर झाला असून ही चारचाकी भंगारात तोडल्याचीही चर्चा होती, या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी गुरुवारी दुपारी अचानक ५० ते ६० पोलिसांचा ताफा घेऊन अजिंठा चौक परिसरातील सर्वच भंगार बाजारात कोम्बीग ऑपरेशन राबविले. यात ११ जणांची कसून चौकशी करण्यात आली.
दोन दुचाकीसह, चारचाकीचे इंजिन जप्त
या मोहिमेत यासीन खान हुसेन खान (रा.पोलीस कॉलनी) याच्या भंगार दुकानात दुचाकी (क्र.एम.एच.१९ एफ.७१००), सादीन शेख रज्जाक शेख (रा.सुप्रीम कॉलनी) याच्या दुकानात दुचाकी (क्र.एम.एच.१९ पी.९७७३) संशयास्पदरित्या आढळून आली. या वाहनाचे कोणतेही कागदपत्र दुकानदारांकडे नव्हते. ही दोन्ही वाहने पोलिसांनी जप्त केली आहे, त्याशिवाय अकील खान करीम खान (रा.रजा कॉलनी) याच्या दुकानातून जुन्या ट्रकचे इंजिन तर तौशिफ शाकीर खान (रा.रजा कॉलनी) कारचे इंजिन संशयास्पदरित्या आढळून आले. हे इंजिनही पोलिसांनी जप्त केले. दरम्यान, या कारवाईमुळे भंगार बाजाराला छावणीचे स्वरुप आले होते, तर काही विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली होती.
कारवाई अजिंठा चौकात,पडसाद बी.जे.मार्केटमध्ये
अजिंठा चौकात भंगार विक्रेत्यांकडे चौकशी आणि तपासणी सुरु असल्याची माहिती मिळताच नवीन बी.जे.मार्केट परिसरात खळबळ उडाली. भंगार विक्रेत्यांनी लावलेली दुकाने बंद करुन तेथून काढता पाय घेतला. यामुळे या भागातील रस्ते व बी.जे.मार्केटने मोकळा श्वास घेतला होता.
--