आता हॉल तिकिटावरच असेल वेळापत्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 12:18 PM2020-02-10T12:18:27+5:302020-02-10T12:18:41+5:30
दहावी १८ फेबु्रवारी तर बारावीचे पेपर ३ मार्चपासून : यंदा १ लाख १३ हजार विद्यार्थी देणार परीक्षा
जळगाव : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने येत्या १८ फेब्रुवारीपासून बारावी तर ३ मार्चपासून दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्वाचा टप्पा असलेल्या या परीक्षेला जिल्हाभरातील १ लाख १३ हजार ४७३ विद्यार्थी असतील.
यंदा बारावीचे ४९ हजार ४०३ तर इयत्ता दहावीचे ६४ हजार ७० विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. जि.प. माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने बारावीसाठी ७१ तर दहावीेसाठी १३४ केंद्रे असतील.
दहावीसाठी १८ तर बारावीसाठी २२ परीरक्षक असतील. दरम्यान, नुकतीच दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात नाशिक बोर्डात अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात परीक्षेच्या अनुषंगाने आवश्यक सूचना करण्यात आल्या आहेत़ तर उपद्रवी केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्याचेही आदेश केले आहे़
नाशिक विभागातून ३ लाख ८२ हजार विद्यार्थ्यांना परीक्षेचे वेध
नाशिक विभागातून दहावी आणि बारावी परीक्षेला ३ लाख ८२ हजार ९२२ विद्यार्थी असतील. त्यात नाशिक जिल्ह्यात दहावीसाठी ९७ हजार ९३४ तर बारावीसाठी ७५ हजार ३४३, धुळे जिल्ह्यातील दहावीसाठी ३१ हजार ८३७ तर बारावीसाठी २५ हजर २६४, नंदुरबार जिल्ह्यातून दहावीसाठी २२ हजार ६०३ तर बारावीसाठी १६ हजार ४६८, जळगाव जिल्ह्यातील दहावीसाठी ६४ हजार ७० व बारावीसाठी ४९ हजार ४०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे़ दहावीची एकूण ४४५ आणि बारावीच्या परीक्षेसाठी २३४ केंद्र असतील.
हॉलतिकीटावर वेळापत्रक
मराठी विषयाच्या पेपराने दहावी तर इंग्रजी विषयाच्या पेपराने बारावीची परीक्षा प्रारंभ होईल़ दरम्यान, शिक्षण मंडळाने घेतलेल्या अभिनव निर्णयामुळे विद्यार्थ्यांना चांगली मदत होणार आहे़ विद्यार्थ्यांना परीक्षेचे वेळापत्रक आणि प्रवेशपत्र एकच आहेत़ परीक्षेचा विषय व तारीख तसेच सत्राची ठळक नोंद प्रवेश पत्रावर करण्यात आली आहे़ त्यामुळे आपला कुठला पेपर कोणत्या दिवशी हे विद्यार्थ्यांना हॉल तिकीटावरूनच कळण्यास मदत होईल़
पर्यवेक्षकावर कारवाईचा बडगा
एकाच वर्गात पाच पेक्षा अधिक विद्यार्थी कॉपी करताना आढळल्यास संबंधित पर्यवेक्षकावर कारवाई करण्यात येणार आहे़
जिल्ह्यात ३९ उपद्रवी केंद्रे
व्हॉट्सअॅपवर प्रश्नपत्रिका व्हायरल होणे, टवाळखोरांकडून कॉपी पुरविणे, गोंधळ होणे असे आदी प्रकार घडणाºया उपद्रवी केद्रांवर भरारी पथकांचे विशेष लक्ष असेल. जिल्ह्यात असे एकूण ३९ उपद्रवी केंद्र असून दहावीचे २० तर बारावीचे १९ उपद्रवी केंद्र आहे़ याठिकाणी बैठे पथक असेल.
सात भरारी पथकांची नजर... या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात घेण्यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने सात भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे पथक जिल्हाभरातील सर्व केंद्रांवर टप्प्याटप्याने धाडी टाकणार आहेत. या भरारी पथकांमध्ये शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (निरंतर), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), प्राचार्य डायट, जेष्ठ अधिव्याख्याता डाएट तसेच महिला भरारी पथकाचा समावेश आहे. याशिवाय प्रत्येक विषयासाठी व प्रत्येक केंद्रांवर पेपरच्या कालावधीमध्ये पूर्ण तीन तास बैठे पथकही कार्यरत राहणार आहे. विशेष म्हणजे, जिल्हा दक्षता समिती सदस्य अचानक परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देवू शकतात़