शिष्यवृत्तीची परीक्षा २३ मे रोजी ; विद्यार्थ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:16 AM2021-04-01T04:16:56+5:302021-04-01T04:16:56+5:30
जळगाव : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इ.पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.आठवी) ही आता २३ मे रोजी होणार ...
जळगाव : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इ.पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.आठवी) ही आता २३ मे रोजी होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता शाळांना दुसऱ्यांदा १० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत. त्यामुळे यंदा पाचवी-आठवी शिष्यवृत्ती परीक्षा होणार की नाही हा संभ्रम निर्माण झाला होता. अखेर शिक्षण विभागाने पत्र काढत, शिष्यवृत्ती परीक्षा ही २५ एप्रिलला होणार असल्याबाबत स्पष्ट केले होते व २१ मार्चपर्यंत आवेदनपत्र भरण्यास मुदत देण्यात आली होती. परंतु, आता परीक्षेच्या वेळापत्रकात शासनाकडून बदल करण्यात आला असून ही परीक्षा २३ मे रोजी घेण्यात येणार आहे.
अर्ज भरण्यास मुदतवाढ
परीक्षेला पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. परीक्षा आता २३ मे रोजी होणार असल्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुध्दा तारीख वाढवून देण्यात आली आहे. त्यानुसार १० एप्रिलपर्यंत शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र भरता येईल. ज्यांनी आवेदनपत्र भरले नाहीत, त्यांनी मुदतीत भरून घेण्याचे आवाहन शिक्षण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
असा करावा अर्ज
डब्लूडब्लूडब्लू डॉट एमएससीईपुणे डॉट इन आणि डब्लूडब्लूडब्लू डॉट एमएससीईपीयूपीपीएसएस डॉट इन या वेबसाईटवर वेळापत्रक, माहितीपुस्तिका आणि अर्ज उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसंबंधी संपूर्ण माहिती यावर देण्यात आली आहे.