शिष्यवृत्ती परीक्षा होऊ शकते, मग शाळेची का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:14 AM2021-04-13T04:14:55+5:302021-04-13T04:14:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एनएमएमएससह इतर शिष्यवृत्तीच्या परीक्षा होऊ शकतात. शालेय विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर बोलावून त्यांची शिष्यवृत्तीची ...

Scholarship exams can happen, so why not school? | शिष्यवृत्ती परीक्षा होऊ शकते, मग शाळेची का नाही?

शिष्यवृत्ती परीक्षा होऊ शकते, मग शाळेची का नाही?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एनएमएमएससह इतर शिष्यवृत्तीच्या परीक्षा होऊ शकतात. शालेय विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर बोलावून त्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा घेण्यात येते. मग शाळेची परीक्षा का घेण्यात येत नाही, असा सवाल पालकांसह काही शिक्षणतज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.

पहिली ते आठवी व नववी, अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता, पास करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे; परंतु या निर्णयाला काही पालकांनी विरोध केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यात दररोज शेकडोने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना संसर्गामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता, राज्य शासनाने इयत्ता पहिली ते आठवी आणि इयत्ता नववी ते अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करून त्यांना पुढील वर्गात तसेच ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरुध्‍द काही पालक व शिक्षणतज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली असून, शालेय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची परीक्षा घेण्यात येते. विद्यार्थी, शिक्षकांना परीक्षा केंद्रावर बोलाविण्यात येते. पण, विद्यार्थ्यांची ऑनलाइन शाळेची परीक्षा ऑनलाइन का घेतली गेली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. परीक्षा न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास बाजूला सारला आहे. परीक्षाच नाहीतर अभ्यास नाही. या विचारातून मुले अभ्यासाकडे दुर्लक्ष करू शकतात आणि त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती पालकांसह शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा घेण्याविषयी विचार करावा, असेही काही पालकांचे म्हणणे आहे.

परीक्षेबाबत तज्ज्ञ काय म्हणतात...

गेल्या वर्षभरात कोरोनाच्या परिस्थितीमुळे बराच वेळ शाळेच्या बाहेर असलेल्या आणि काही काळ शाळेत आलेल्या मुलांचे कोणत्या ना कोणत्या पध्‍दतीचे मूल्यमापन होणे गरजेचे होते. वर्षभरात शिक्षक व पालकांनी ऑनलाइन व ऑफलाइन विद्यार्थ्यांशी संवाद साधून शिक्षण अखंडित सुरू ठेवले. याची चाचणी म्हणून ऑनलाइन का होईना थोड्याफार प्रमाणात घेता आली असती. परंतु, सरसकट सर्व उत्तीर्ण केल्याने विद्यार्थ्यांची संपादन पातळी समजून येणार नाही. कोरोनाच्या परिस्थितीमुळे घेतलेला हा निर्णय योग्य वाटत असला तरी काही अंशी का होईना, ऑनलाइन पध्‍दतीने मूल्यमापन व्हायला हवे होते, असे वाटते.

- डॉ. जगदीश पाटील, सदस्य मराठी भाषा अभ्यास मंडळ, बालभारती पुणे.

--------------

विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांना पुढील वर्गात ढकलण्याचा शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. मात्र, परीक्षांचे नियोजन केले तर ऑनलाइन परीक्षा घेणे गरजेचे आहे. परंतु, आजही बहुतांश विद्यार्थ्यांकडे मोबाइल नाही. त्यांना परीक्षा देणे शक्य होणार नाही. त्यामुळे शासनाचा निर्णय योग्य आहे.

- किशोर राजे, शिक्षण तज्ज्ञ

---------------------

शिष्यवृत्तीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असते; परंतु शालेय विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली, तर विद्यार्थीसंख्याच लाखाच्या घरात आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत शालेय विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे घातक ठरेल. दुसरीकडे काही विद्यार्थ्यांकडे मोबाइल नाही. परंतु, गुणवत्तेच्या दृष्टीने सक्ती न करता ऑनलाइन परीक्षेचे आयोजन करता येऊ शकते.

-मानव भालेराव, टेक्नोसेव्ही शिक्षक

--------------------

सध्‍या शाळा बंद आहेत. पण, ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. बऱ्याच वेळा नेटवर्क नसल्यामुळे मुलांचे ऑनलाइन शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. आतातर परीक्षाच रद्द केल्या आहेत. त्यामुळे अभ्यास, दप्तर बाजूलाच ठेवले गेले. परीक्षा घेण्यात आल्या तर त्यानिमित्ताने विद्यार्थी अभ्यास करतील.

-सोनू सोनार, पालक

--------------------

सध्‍या कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शिष्यवृत्ती परीक्षा ही एक दिवसाची असते. जर शालेय परीक्षा घेतली तर ती आठवडाभर तरी सुरू राहिली. त्यामुळे शासनाने घेतलेला निर्णय हा योग्य आहे.

- पांडुरंग पाटील, पालक

--------------------

ही ढकलगाडी काय कामाची

परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पास करणे योग्य नाही; परंतु कोरोनाची परिस्थिती पाहता, शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचारही होणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया काही पालकांनी व्यक्त केली, तर काही पालकांनी ही ढकलगाडी काय कामाची... असा प्रश्न उपस्थित करीत, शासनाने परीक्षा न घेण्याचा घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम करणारा असल्याचे म्हटले आहे.

------------------------

एकूण विद्याथी संख्‍या

- ७,४६,२४८

------------------------

चौथीच्या वर्गात सर्वाधिक विद्यार्थी

- ८०,०५०

-------------------------

वर्ग विद्यार्थी संख्या

पहिली ७६,५१४

दुसरी ७९,३१३

तिसरी ७७,९१८

चौथी ८०,०५०

पाचवी ७८,८२८

सहावी ७७,६७७

सातवी ७७,६७७

आठवी ७६,३८५

नववी ७६,३५८

अकरावी ४५,८९४

Web Title: Scholarship exams can happen, so why not school?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.