‘द स्कूल आॅफ अथेन्स’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 01:04 PM2018-02-20T13:04:03+5:302018-02-20T13:04:28+5:30
तत्त्वज्ञांची मांदियाळी
ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात ‘ईश्वरनिष्ठांची मांदियाळी’ भेटावी, अशी इच्छा प्रकट केली आहे. अशीच एक कल्पित मांदियाळी ‘द स्कूल आॅफ अथेन्स’ या चित्रामध्ये रंगवली आहे. व्हॅटिकन शहरातील ‘अॅपॉस्टॉलिक पॅलेस’ या वास्तूमध्ये हे भित्तीचित्र आहे. एका मोठ्या दालनाच्या चार भिंतीवर तत्त्वज्ञान, काव्य, ब्रह्मज्ञान आणि कायदा अशा चार ज्ञान शाखांचे प्रतीक, अशी चार चित्रं दिसतात. त्यातील ‘तत्त्वज्ञान’ विषयाचं प्रतीक असलेलं चित्र म्हणजे स्कूल आॅफ अथेन्स. ते रंगवलं आहे ‘राफाएल’ या प्रसिद्ध इटालियन चित्रकाराने. राफाएल हा ‘लिओनार्डाे दा विंची’चा समकालीन आणि त्याचाच शिष्य होता. त्याने सन १५१० च्या सुमारास ही कलाकृती रंगवली. १७ फूट बाय २५ फूट असं भव्य भित्तीचित्र आहे हे!
या चित्रात दाखविलेलं ‘स्कूल आॅफ अथेन्स’ प्रत्यक्षातील नसून ते काल्पनिक आहे. खरंतर रूपकात्मक आहे. ग्रीक इतिहास हा जसा अनेक देव-देवतांच्या कथांनी भरलेला आहे, तसाच तो कित्येक तत्त्वज्ञांनी पण भरला आहे.... अगदी आपल्या इतिहासाप्रमाणे! अथेन्स हे ग्रीसमधील शहर एकेकाळी या तत्त्वज्ञांचे माहेरघर होते. त्यातले कित्येक पूर्णपणे निरीश्वरवादी होते. वेगवेगळ्या कालखंडात होऊन गेलेले, वेगवेगळ्या ज्ञानशाखांचे हे तत्त्वज्ञ एका ठिकाणी, एका छताखाली एकत्र येऊन चर्चा करताहेत, अशी एक कविकल्पना करून ती राफाएलने चित्राच्या माध्यमातून मांडली आणि मग तत्त्वज्ञांच्या या जमावाला- मांदियाळीला त्याने नाव दिलं- ‘द स्कूल आॅफ अथेन्स’.
चित्रात अगदी मध्यभागी ठळकपणे दिसणारी प्रमुख दोन पात्रं म्हणजे प्लेटो आणि अॅरिस्टॉटल. ते आपापल्या सिद्धांतावर चर्चा करताना दिसतात. उजव्या कोपºयात खाली आर्किमिडिज (किंवा युक्लिड) खाली वाकून काही भूमितीय आकृती काढतोय. पायºयांवरती ‘डायोजिनस’ हा साधू वृत्तीचा नि:स्संग तत्त्ववेत्ता पहुडला आहे.
प्लेटोच्या डाव्या बाजूला त्याचा गुरू सॉक्रेटिस काहीतरी गहन विषय समजावतोय आणि ऐकणाºयांमध्ये स्वत: अॅलेक्झांडर द ग्रेटसुद्धा आहे. डाव्या हाताला खाली, हातात एक ग्रंथ घेऊन पायथॅगोरस काहीतरी नोंदी करतोय - तोच तो, भूमितीच्या पेपरमध्ये आपल्याला छळणारा पायथॅगोरस! अशी वीस एक पात्र ओळखू येतात. गंमत म्हणजे राफाएलने ही ऐतिहासिक पात्र किंवा व्यक्ती रंगवण्यासाठी त्याच्या काळातल्या प्रसिद्ध व्यक्तींचे चेहरे वापरलेत. एक प्रकारे त्याच्या परिचितांना त्याने कोणत्यातरी तत्त्वज्ञाच्या ‘भूमिकेत’ टाकलंय.
उदाहरणार्थ- प्लेटो या मुख्य व्यक्तिरेखेचा चेहरा बघताक्षणी लक्षात येतं, की तो लिओनार्डाे दा विंची आहे. ‘हेराक्लिटस’ला चेहरा मायकेलँजेलोचा आहे आणि टॉलेमीच्या मागे कमानीजवळ एका छोट्याशा भूमिकेत स्वत: राफाएल आहे. तो चित्रात थेट आपल्याकडे बघताना दिसतो. या भित्तीचित्राची सुमारे अडीचशे वर्षांनंतर, म्हणजे १७५५ साली कॅनव्हासवर एक प्रतिकृती रंगवली गेली. योगायोगाची गोष्ट अशी की ही प्रतिकृती रंगवणारा जो कलाकार आहे, त्याचं नावसुद्धा ‘अॅण्टोन राफाएल’ असंच आहे. ते चित्र सध्या इंग्लंडमधील ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम’मध्ये ठेवलं आहे.
दा विंची, मायकेलँजेलो आणि राफाएल हे तिघे रेनेसन्सच्या कालखंडातील कलाजगतातले ‘अमर-अकबर-अँथनी’ होते, असं म्हणता येईल. त्यातला राफाएलची ‘द स्कूल आॅफ अथेन्स’ ही सर्वाेत्कृष्ट कलाकृती आहे!
- अॅड.सुशील अत्रे