शाळेची घंटा वाजली अन् विद्यार्थ्यांचे फुलले चेहरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:13 AM2021-07-16T04:13:17+5:302021-07-16T04:13:17+5:30
जळगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रांगण गुरूवारी गजबजले. ग्रामीण भागातील ३०६ शाळांमधील ...
जळगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रांगण गुरूवारी गजबजले. ग्रामीण भागातील ३०६ शाळांमधील आठवी ते बारावीच्या वर्गांना सुरूवात झाल्याने पहिल्या दिवशी १० हजार २७१ विद्यार्थ्यांनी शाळा, महाविद्यालयांमध्ये हजेरी लावली. विद्यार्थ्यांचे स्वागत करताना सॅनिटायझर, थर्मल स्कॅनिंग करत शिक्षकांनी सुरक्षिततेला प्राध्यान्य दिले. शाळेची घंटा वाजताच विद्यार्थ्यांच्या चेहरे फुलले. नंतर विद्यार्थ्यांनी विविध विषयांचे धडे गिरविले. दरम्यान, एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत पहिल्या दिवशी कमी विद्यार्थ्यांनी उपस्थिती दिली होती.
काही दिवसांपूर्वी शासनाने कोरोनामुक्त गावातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. पण, ग्रामपंचायतींचा ठराव आणि पालकांच्या संमतीनंतर शाळा सुरू कराव्यात अशाही सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाने शाळांकडून शाळा सुरू करण्यासंदर्भात ठराव मागविले होते. कोरोनामुक्त गावातील ७०८ शाळांपैकी ३०६ शाळांचे ठराव बुधवारी शिक्षण विभागाला प्राप्त झाले होते. अखेर गुरूवारी सकाळी आठवी ते बारावीच्या वर्गांच्या शाळांची घंटा वाजली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण नियमांचे पालक करित शाळांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग व हात सॅनिटाईज केल्यानंतर शाळांमध्ये प्रवेश दिला जात होता. तसेच त्यासोबत गुलाबपुष्प देण्यात येत होते.
मैदान गजबजले...
ग्रामीण भागात आठवी ते बारावी वर्ग असलेल्या ७०८ शाळा आहेत. यामध्ये १ लाख ६८ हजार ६७० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ मात्र, पहिल्या दिवशी उपस्थितीला कमी प्रतिसाद मिळाल्याचे पहायला मिळाले. केवळ १० हजार २७१ विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये हजेरी लावली. दरम्यान, शाळा सुरू करण्याआधी शिक्षकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले होते़ त्यानुसार एकूण ९ हजार ४५ शिक्षकांपैकी ५ हजार ८४१ शिक्षकांनी लस घेण्यात आली होती. तर २ हजार २०१ शिक्षकेतर कर्मचा-यांनी सुध्दा लसीचा डोस घेतला होता.
मित्र-मैत्रिणींची भेट झाल्याने आनंद द्विगुणित
मागील वर्षाच्या मार्च महिन्यापासून शाळा, महाविद्यालये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद होती. अखेर गुरूवारी एक ते दीड वर्षानंतर मित्र-मैत्रीणींची भेट झाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. शिक्षकांनी सुध्दा विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत, एका वर्गात दहा ते पंधरा विद्यार्थी बसविले होते. नंतर विविध विषयांचे धडे विद्यार्थ्यांनी गिरविले.
दीड वषार्नंतर शाळेत पुन्हा विद्यार्थ्यांचा किलबिलाट!
तब्बल दीड वषार्नंतर शाळेत पुन्हा विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाल्याचे पहायला मिळाले. शिक्षकांकडूनही वर्गात अध्यापनाचे काम सुरु झाले आहे. शाळा सुरु करण्याला गावक-यांनी दुजोरा दिला होता. ऑनलाइनला विद्यार्थी कंटाळले होते तर मोबाईलवर शिकवून शिक्षक कंटाळले होते. आता शाळा सुरु झाल्याने शिक्षकांना थेट विद्यार्थ्यांना धडे देता येणार आहेत.