स्कूल बसची वीज खांबाला धडक
By admin | Published: January 31, 2017 12:18 AM2017-01-31T00:18:10+5:302017-01-31T00:18:10+5:30
जामनेर : 10 विद्यार्थी जखमी, खासगी रुग्णालयात उपचार
जामनेर : शाळा प्रशासन आणि संबंधित चालकाच्या दुर्लक्षामुळे लहान विद्याथ्र्याना घेऊन येणारी जैन इंटरनॅशनल स्कूलची मिनीबस विजेच्या खांब्याला धडकून आठ ते 10 विद्यार्थी जखमी झाले. ही घटना 30 रोजी रोजी सकाळी नऊ वाजता घडली.
शहरात चार ते पाच इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा आहेत. त्यामध्ये तालुक्यातील शेकडोच्या संख्येमध्ये लहान मुले येतात. त्यांच्याकडून घरून आणणे आणि त्या सर्वाना घरी पोहोचविण्यासाठी वेगळी फी वसूल केली जाते.
जैन इंटरनॅशनल स्कूलची मिनीबस शहरातील पाचोरा रस्त्यावरील मथाईनगरमध्ये आली. तेव्हा बसने वीज खांबाला धडक दिली. त्यात आठ ते 10 विद्यार्थी जखमी झाले. यात केशव कांतीलाल चौधरी, तुषार चौधरी, जयेश गोरे, अभिजित, ऋषिकेश आणि भावेश आदी विद्याथ्र्याचा समावेश आहे. विशेष म्हणजे संबंधित शाळेतून विद्याथ्र्याची पूर्ण नावे, गाव आदी माहिती देण्यात आली नाही.
सर्व जखमी विद्याथ्र्यावर जळगाव रस्त्यावरील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
विशेष म्हणजे दवाखान्यात दाखल केल्यानंतर विद्याथ्र्यानीच आपापल्या पालकांना झालेली घटना कळविली. त्यानंतर पालकांची दवाखान्यात मोठय़ा प्रमाणात गर्दी उसळली होती. जखमी विद्याथ्र्याना विचारले असता गाडी सुरू असताना चालक गाडीचा काच पुसत होता. त्यामुळे अपघात झाल्याचे सांगण्यात येते. संबंधित वाहनामध्ये प्रथमोपचाराचे कोणतेही साहित्य दिसून आलेले नाही. यापूर्वीही लार्ड गणेशा स्कूल बसला अपघात होऊन अनेक विद्यार्थी त्यावेळी गंभीर जखमी झाले होते. आता पुन्हा सर्वात मोठय़ा अशा जैन इंटरनॅशनल स्कूल बसचा हा दुसरा अपघात झाला आहे. याबाबत अद्यापही पोलीस ठाण्यात घटनेची नोंद नाही. (वार्ताहर)
घटना घडताच चालकाने माहिती दिली. लागलीच उपप्राचार्य, लिपीक, शिक्षक आदींना दवाखान्यात पाठविले. आम्ही सतत विद्याथ्र्याची काळजी घेत असतो. आमच्या जबाबदारीवर सर्व बालक विद्यार्थी आमच्या ताब्यात राहतात. आम्ही त्यांची जीवापाड काळजी नेहमीच घेत असतो.
- फिरोजा खान, प्राचार्या, जैन इंटरनॅशनल स्कूल, जामनेर