कोरोनामुळे शाळा बंदच, आता विद्यार्थी तेथे भरते शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:12 AM2021-07-08T04:12:21+5:302021-07-08T04:12:21+5:30

भडगाव : कोरोना आजाराच्या प्रादुर्भावामुळे शाळा मार्च २०२० पासून बंद आहेत. विद्यार्थ्यांना शालेय प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी विधायक ...

School closed due to corona, now students fill school there | कोरोनामुळे शाळा बंदच, आता विद्यार्थी तेथे भरते शाळा

कोरोनामुळे शाळा बंदच, आता विद्यार्थी तेथे भरते शाळा

Next

भडगाव : कोरोना आजाराच्या प्रादुर्भावामुळे शाळा मार्च २०२० पासून बंद आहेत. विद्यार्थ्यांना शालेय प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी विधायक व कल्पक उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. अगदी त्याच धर्तीवर भडगाव येथील लाडकूबाई प्राथमिक विद्यामंदिर भडगाव शाळेने ऑनलाइन उपक्रमांची सुरुवात तालुक्यात सर्वप्रथम केली; परंतु ज्या कष्टकरी पालकांकडे अँड्राॅइड फोन नाही, अशा विद्यार्थ्यांना मात्र ऑनलाइन शिक्षणासाठी मर्यादा येत होत्या. त्या विद्यार्थ्यांपर्यंतदेखील पोहोचणं गरजेचं आहे, हे सूत्र लक्षात घेऊन शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘विद्यार्थी तेथे शाळा’ हा उपक्रम सुरू केला आहे.

या उपक्रमात सकाळच्या सत्रात शाळा ऑनलाइन पद्धतीने ज्ञानदानाचे काम करते व दुसऱ्या सत्रात शाळेतील शिक्षक ज्या ठिकाणी विद्यार्थी आहेत असे मध्य ठिकाण निवडून विद्यार्थ्यांना बोलावून शिक्षक प्रत्यक्ष अध्यापनाचे काम करताहेत. यात शाळेने विद्यार्थ्यांच्या ठिकाणानुसार पाच झोन केले असून, यशवंतनगर, बाजार चौक, महादेव गल्ली, निंभोरा, कोठली याठिकाणी शिक्षक नियमितपणे सकाळी १०.०० ते ११.३० यावेळेत दीड तास उपस्थित राहून कोरोनासंदर्भात सर्व नियमांचे काटेकोर पालन करून अध्यापनाचं काम करीत आहे.

या उपक्रमाला पालक, विद्यार्थी यांच्याकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून, पुन्हा एकदा विद्यार्थ्यांमध्ये शालेय वातावरण तयार होताना दिसत आहे.

शाळा दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबर सेतू अभ्यासक्रमाचीदेखील प्रभावीपणे अंमलबजावणी करीत असल्यामुळे मागील इयत्तेतील संबोध स्पष्ट होण्यास विद्यार्थ्यांना मदत होत आहे. शाळेने सुरू केलेल्या उपक्रमाबद्दल पालक समाधान व्यक्त करीत आहेत. शिक्षक व विद्यार्थी यांच्या प्रत्यक्ष संवादातून अनेक सकारात्मक बदल विद्यार्थ्यांमध्ये घडून येताना दिसत आहेत.

या उपक्रमाबद्दल शाळेचे व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पाटील, सचिव डॉ. पूनम पाटील, संचालक प्रशांत पाटील यांनी कौतुक व्यक्त केले आहे.

मुख्याध्यापक कमलेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने सुरू केलेला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संगीता शेलार, सुनीता देवरे, अनिता सैंदाणे, रवींद्र पांडे, अनंत हिरे, ज्ञानेश्वर गांगुर्डे, सुयोग पाटील ही शिक्षकांची टीम विशेष परिश्रम घेत आहे.

Web Title: School closed due to corona, now students fill school there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.