रांजणगावातून शालेय पोषण आहाराची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 04:17 PM2018-12-14T16:17:01+5:302018-12-14T16:25:40+5:30
राजंणगाव येथील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या हरीभाऊ चव्हाण माध्यमिक विद्यालयातून १४ क्विंटल तांदुळ व २५ किलो वाटाणा, १ क्विंटल मठ असा ५२ हजार ३८४ रुपए किंमतीचा शालेय पोषण आहार चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
चाळीसगाव : राजंणगाव येथील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या हरीभाऊ चव्हाण माध्यमिक विद्यालयातून १४ क्विंटल तांदुळ व २५ किलो वाटाणा, १ क्विंटल मठ असा ५२ हजार ३८४ रुपए किंमतीचा शालेय पोषण आहार चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा आहार चोरून नेण्यासाठी चार चाकी वाहनाचा वापर करण्यात आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती अशी की, राजंणगाव येथील हरीभाऊ चव्हाण माध्यमिक विद्यालयातील शिपाई निंबा चव्हाण हे १२ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शाळा उघडण्यासाठी गेले असता हा प्रकार उघड झाला.
ही घटना मंगळवार ११ रोजी सायंकाळी ४.३० ते बुधवार १२ रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान घडली आहे. चोरट्यांनी शालेय पोषण आहार ठेवल्या जाणाऱ्या कोठाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी अंदाजे २२ हजार ५०० रुपए किंमतीचा १४ क्विंटल ८१ किलो तांदुळ, एक हजार रुपए किंमतीचा १ क्विंटल ५० किलो मठ, १ हजार रुपए किंमतीचे २५ किलो वाटाणे, ४ हजार ९५० रुपए किंमतीचा १ किंटल १० किलो हरभरा, असा एकूण ५२ हजार ३८४ रुपए किंमतीचा शालेय पोषण आहार चोरून नेला.
याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी नारायण देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भादंवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार किशोर सोनवणे हे करीत आहेत.