मुलांच्या ‘आरटीई’ प्रवेशासाठी पालकांकडून ‘शाळा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 12:32 PM2020-07-23T12:32:34+5:302020-07-23T12:32:44+5:30
शिक्षणासाठीही बनवाबनवी : मूळ रहिवाशांचे पाल्य राहिले वंचित; पालकांची शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार
जळगाव : मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा अंतर्गत खासगी शाळांमध्ये देण्यात येणाºया २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया सध्या सुरु आहे. मात्र, दुसरीकडे काही पालकांनी आपल्या पाल्याच्या आरटीई प्रवेशासाठी जळगाव तालुक्यातील वावडदा येथे वास्तव्यास नसतानाही भाडेकरू दाखवून प्रवेशास पात्र ठरल्याचा धक्कादायक प्रकार मूळ गावातील पालकांच्या तक्रारीनंतर समोर आला आहे़ याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली असून १३ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे़
आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास प्राथमिक शिक्षण मोफत मिळावे, शिक्षणाचा अधिकार मिळावा, यासाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार दुर्बल, वंचित घटकांतील मुलांना खासगी विनाअनुदानित, खासगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश राखीव ठेवण्याची तरतूद आहे. या कायद्यानुसार यंदा आरटीई प्रवेशासाठी जिल्ह्यातील २८७ शाळांमध्ये ३ हजार ५९४ जागा आहेत़ त्यासाठी ८ हजार ४६३ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते़ त्यापैकी ३ हजार ३४१ विद्यार्थी प्रथम फेरीत प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत़
गावातील विद्यार्थी प्रतीक्षा यादीत
प्रवेशासाठी लवकर क्रमांक लागावा, त्याचबरोबर हवी ती शाळा मिळावी म्हणून १३ पालकांनी वावडदा येथे भाडेतत्वावर राहत असल्याचे दाखवून आरटीई प्रवेश प्रक्रियेत सहभाग नोंदविला व त्यात त्यांच्या पाल्यांना लॉटरीही लागली़ दुसरीकडे मात्र, मूळ गावात राहत असलेल्यांच्या पाल्यांचे नाव प्रतीक्षा यादीत गेले़ त्यात रेणूका पाटील, ओम संदीप पवार, श्रेयस पवार, वैष्णवी पाटील या विद्यार्थ्यांचा समावेश आहे़ दरम्यान, या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी जे विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले, त्यांचे पालक वावडदा गावातच वास्तव्यास नसून त्यांनी बनावट भाडेकरू दाखवून आरटीई प्रवेश प्रक्रियेत सहभाग नोदविल्याचा प्रकार निदर्शनास आणून दिला.
ते पालक गावात राहत नसल्याचे सरपंचांचे पत्र
ज्या विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहे, त्यांच्या पालकांनी वावडदा सरपंच यांच्याकडे तक्रार केल्यानंतर गावात संपूर्ण चौकशी पाहणी केली असता जे १३ विद्यार्थी एल़एच़पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेशासाठी पात्र ठरले आहे, त्यांचे पालक गावात राहतच नसल्याचे समोर आले़ त्यानंतर सरपंचांनी याबाबत शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून प्रवेशास पात्र ठरलेल्या त्या विद्यार्थ्यांचे पालक गावात राहत नसल्याचे पत्र दिले आहे़
शिक्षण विभागाकडे तक्रार प्राप्त
वावडदा सरपंच यांनी केलेली तक्रार शिक्षण विभागाला प्राप्त झाली आहे़ त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली़ तर संबंधित शाळेलाही चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़
पत्ता बदलविण्यासाठी धडपड
शहरातील काही पालकांकडूनही लवकरात लवकर आरटीई प्रवेशासाठी क्रमांक लागवा म्हणून आधारकार्डमधील पत्त्यांमध्ये बदल करण्यासाठी धडपड सुरू असल्याची सूत्रांकडून मिळाली आहे़ तर काहींनी शाळेच्या काही अंतरावरचं घर असल्याचे दाखवून काही पालकांकडूनही ‘शाळा’ केली जात असल्याचा समोर येत आहे़
ज्या पालकांनी चुकीची माहिती भरली असेल, त्यांच्या पाल्यांचे प्रवेश रद्द करण्यात येतील़ प्रवेश रद्द करण्याचा अधिकार हा गटशिक्षणाधिकारी यांनाही आहे़
- बी़एस़अकलाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी