विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 02:01 PM2020-11-22T14:01:35+5:302020-11-22T14:02:23+5:30
महाराष्ट्र शासनाच्या शालेय विभागाच्या आदेशानुसार सोमवारपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत.
धरणगाव : महाराष्ट्र शासनाच्या शालेय विभागाच्या आदेशानुसार सोमवारपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. यासाठी गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा असलेल्या शतकमहोत्सवी पी.आर. हायस्कूलची तयारी पूर्ण झाली आहे. सुटीच्या काळात पी.आर. हायस्कूलच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने स्वतः शालेय परिसराची स्वच्छता करुन शाळेसाठी आपले योगदान दिले आहे. शालेय विभाग तथा गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे आणि धरणगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.एस.पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार सर्व सूचनांचे पालन केले जात आहे. पालिकेच्या वतीने नगराध्यक्ष नीलेश सुरेश चौधरी यांच्या पुढाकाराने सर्व शाळा आणि शाळेचा परिसर सॅनिटायझराईज करण्यात आला आहे. नगराध्यक्ष चौधरी यांनी शाळेला पल्स आॅक्सीमिटर, थर्मा मिटर आणि सॅनिटायझर पुरवले आहे, तर जळगावच्या एका संस्थेने शाळेला हॅन्डस फ्री सॅनिटायझर मशिन भेट दिले आहे. यामुळे विद्यार्थ्यांची काळजी घेतली जाणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरुण कुलकर्णी, उपाध्यक्ष वसंतराव गालापुरे, सचिव डॉ. मिलिंद डहाळे, संचालक अजय पगारीया यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळत आहे. शाळेतील सर्वच्या सर्व ४८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाची कोविड टेस्ट झाली असून सर्वांची टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे. रोज दुपारी १२ ते ३ या दरम्यान तीन ते चार तासिका होणार असून एका बाकावर एक याप्रमाणे विद्यार्थी बैठक करण्यात आली आहे. शाळेतील इयत्ता नववी व दहावीच्या वर्गांची विद्यार्थी संख्या ५५० असून आतापर्यंत शंभर पालकांचे संमतीपत्र प्राप्त झाले आहेत, गेल्या आठ महिन्यांपासून शाळा बंद असल्याने शाळेत येण्यासाठी विद्यार्थी उत्सुक आहेत. पालकांनी आपल्या संमतीनेच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, जे विद्यार्थी शाळेत येणार नाहीत त्यांच्यासाठी शाळेने ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवले आहे, अशी माहिती मुख्याध्यापक डॉ.संजीवकुमार सोनवणे यांनी दिली.