सातवीपर्यंत शाळा, १५१ विद्यार्थी, शिक्षक दोनच... सांगा कसं होणार मुलांचं?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 06:38 AM2023-12-14T06:38:45+5:302023-12-14T06:39:38+5:30
शिक्षक नसलेल्या शाळेत खुद्द सरपंच महिला झाली शिक्षिका; शिकविण्यासाठी स्वखर्चाने केली दोघांची नियुक्ती
गोपाळ व्यास
बोदवड (जि. जळगाव) : पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण... शाळेला आयएसओ नामांकन... तालुक्यातील पहिली डिजिटल शाळा... विद्यार्थी संख्या १५१... शिक्षक मात्र दोनच.. सांगा कसं व्हायचं या मुलांचं? ही अवस्था आहे बोदवड तालुक्यातील मुक्तळ येथील शाळेची...
शाळेत शुद्ध पाणी, डिजिटल फळा, संगणक आहे. सर्व सोयी आहेत; परंतु, शाळेत पुरेसे शिक्षकच नाहीत. एक मुख्याध्यापक आणि एक शिक्षिका या दोघांवरच पूर्ण भार आहे. यामुळे पहिली ते सातवीपर्यंतचे सर्व वर्ग पटांगणात भरवून सर्वांना एकत्र शिकविले जात आहे. जून महिन्यापासून हे सुरू आहे; परंतु, मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने सोमवारी संतप्त गावकऱ्यांनी आपल्या पाल्याला शाळेतून घरी नेले.
...अन् दोन तरुणांना स्वत:कडून पगार
nया प्रकाराची चर्चा गावभर पसरल्याने मुक्तळ गावच्या महिला सरपंच पल्लवी जितेंद्र पाटील यांनी पतीशी याबाबत चर्चा केली. त्यांचे स्वत:चे एमए शिक्षण झाले असल्याने गावाच्या कारभार सोबत आता गावातील मुलांना शिकवण्याचा निर्धारही त्यांनी केला.
nमंगळवारी सकाळीच स्वत: पदरमोड करत दोन उच्चशिक्षित तरुणींना पाच हजार रुपये मानधन देण्याचे आश्वासन देत त्यांना सोबत घेत शाळेचा रस्ता गाठला.
शाळेत मुख्याध्यापक एस.आर. साठे यांच्याशी चर्चा करत शाळा भरवली. यामुळे सर्व पालक विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत हजर झाले व पुन्हा शाळा भरली.
विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करत स्वत: शिकवण्याचे धाडस केले. आणखी दोन शिक्षकही आपल्या खर्चाने महिनाभरासाठी दिले आहेत. शिक्षण विभागाने तत्काळ पुरेशा शिक्षकांची व्यवस्था करावी.
- पल्लवी पाटील, सरपंच
दोघांवर ७ वर्गांचा भार
‘अगोदर शिक्षक द्या, मगच आम्ही मुलांना शाळेत पाठवू, अन्यथा शाळेला कुलूप ठोकू,’ असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला.