शाळा सुरू होताहेत; पण...१२५६ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:17 AM2021-09-26T04:17:56+5:302021-09-26T04:17:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाने ग्रामीण भागातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाने ग्रामीण भागातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर शासनाने कोरोना लस घेण्यासाठी शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सूचना केल्या होत्या. मात्र, अजूनही जवळपास १ हजार २५६ शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसीचा अद्याप एकही डोस घेतलेला नाही. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवायचे तरी कसे, असा प्रश्न पालकांसमोर निर्माण झाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर जुलै महिन्यापासून ग्रामीण भागातील इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यास शासनाकडून परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार सद्य:स्थितीला ग्रामीण भागातील माध्यमिकच्या ७९७ शाळांपैकी ५४८ शाळा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, शाळा, महाविद्यालयांमध्ये रुजू होताना, शिक्षण विभागाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणीसह कोरोना लसीकरण बंधनकारक केले होते; परंतु शहरातील शेकडो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अद्याप कोरोना लसीकरण करून घेतलेले नाही. लसीकरणाबाबत शिक्षकांच्या मनातही काही गैरसमज असल्यामुळे अनेकांनी कोरोनाची लस घेतली नाही. कोरोना प्रतिबंधक लस न घेणारे १ हजार २५६ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या आहे.
११ हजार ५६६ जणांनी घेतला पहिला डोस
इयत्ता आठवी ते बारावीच्या ग्रामीण भागातील ७९७ माध्यमिक शाळांमध्ये १२ हजार ८३२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी ११ हजार ५६६ जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर ७ हजार ९८७ जणांनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. दरम्यान, राज्य शासनाने शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या दोन्ही लसींचे डोस घेण्याची सक्ती केली असतानाही १ हजार २५६ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे लस घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील शंभर टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.
प्रकृतीचे कारण सांगत अनेकांनी घेतली नाही लस
काहींनी वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले असून, काहींना मात्र प्रकृतीच्या कारणामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेता आलेले नाही. काहींनी केंद्रांवरील गर्दीमुळे उशिराने लस घेतली. राज्य शासनाने शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या दोन्ही लसींचे डोस घेण्याची सक्ती केली असतानाही काही जणांकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तालुका सुरू होणाऱ्या शाळा लसीकरण बाकी कर्मचारी
अमळनेर (५४), ११२
भडगाव (२८), २७
भुसावळ (१९), ००
बोदवड (१२), १०
चाळीसगाव (५३), ११४
चोपडा (४२), ११४
धरणगाव (३१), ५७
एरंडोल (२८), ६८
जळगाव (३६), २८
जामनेर (२९), १०४
मुक्ताईनगर (१७), २२
पाचोरा (५९), ३८३
पारोळा (३८), २९
रावेर (५७), १२३
यावल (४५) ६५
--------
- ग्रामीण भागातील एकूण शाळा : ७९७
- सुरू असलेल्या शाळा : ५४८
- शिक्षक, शिक्षकेतर संख्या - १२,८३२
- पहिला डोस घेतलेले : ११,५६६
- दोन्ही डोस घेतलेले : ७,९८७