नववीच्या विद्यार्थ्याला शाळेचे नाव लिहिता येईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 06:47 PM2020-01-15T18:47:48+5:302020-01-15T18:49:17+5:30
नववीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याला शाळेचे नाव उर्दूत लिहिता येत नसल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी येथील अंजूमन हायस्कूलमध्ये दिसून आले.
जामनेर, जि.जळगाव : नववीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याला शाळेचे नाव उर्दूत लिहिता येत नसल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी येथील अंजूमन हायस्कूलमध्ये दिसून आले. पालक समिती सदस्यांनी अचानक शाळेस भेट देऊन मुख्याध्यापक व शिक्षकांशी चर्चा केली.
पालक समितीचे अध्यक्ष शेख हरून, जावेद शेख, खालिद शेख, नदीम शेख, अन्वर पहेलवान, नसीम शेख, नासिर खान, आरिफ शेख, नासिर अहलेकार, शेख फारूक, आसिफ खान, जुबेर अली आदींनी शाळेत भेट दिली. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराबाबत चौकशी केली व उपलब्ध साठा तपासला असता त्यात तफावत आढळून आली. विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध फिल्टर पाणी दिले जावे, शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अभ्यासाचे नियोजन करावे, रोडरोमियोंचा बंदोबस्त करावा आदी मागण्या केल्या.
शिक्षणात कमजोर असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती पालकांना कळविली पाहिजे, असे पालकांनी सांगितले. नववीच्या वर्गातील एका विद्यार्थ्याला मुख्याध्यापक कक्षात बोलावून त्याला फळ्यावर शाळेचे नाव, मालेगाव उर्दू व हिंदीत लिहिण्यास सांगितले असता तो लिहू शकला नाही. यावेळी पालक समिती सदस्य आक्रमक झाले व त्यांनी मुख्याध्यापक व शिक्षकांना विचारणा केली. यावेळी शिक्षक व पालकांमध्ये खडाजंगी झाली. समितीने मुख्याध्यापक यांना मागण्यांचे निवेदन दिले व विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन करण्याचे सांगितले.
पोषण आहारात काहीही तफावत नाही. पोषण आहार बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्याला लिहायला सांगितले, तो थोडा कमजोर आहे. त्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्न करू.
-अजगर शेख, मुख्याध्यापक, अंजूमन हायस्कूल, जामनेर